Home »Sports »From The Field» India Vs Pakistan Third One Day

जिंकलो रे...! टीम इंडियाने लाज राखली

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 04:14 AM IST

  • जिंकलो रे...! टीम इंडियाने लाज राखली

नवी दिल्ली - अख्खी टीम 167 धावांत ढेपाळल्यानंतर तिसरा वनडेसुद्धा आपल्या हातून जाणार असे वाटत होते. भारताचा स्कोअर बघून अनेकांनी आपले टीव्ही संच बंद केले. अनेकांनी पुढचा स्कोअर जाणून घेण्यातही रस दाखवला नाही.

पराभवाचीच शक्यता अधिक असल्याने टीम इंडियाच्या जवळपास प्रत्येक चाहत्याने सामन्याकडे पाठ वळवली होती. मात्र झाले उलट. फलंदाजांनी नांग्या टाकल्यानंतर युवा गोलंदाजांनी दिल्लीत ‘दम’ दाखवला. अप्रतिम गोलंदाजी आणि दमदार क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाने मालिकेतील अखेरच्या आणि तिस-या वनडेत 10 धावांनी रोमांचक विजय मिळवला. आपल्या गोलंदाजांनी क्लीन स्वीप करण्याचे पाकचे मनसुबे उधळले. ईशांतच्या गोलंदाजीवर युवराजसिंगने मो. हफिजचा झेल घेताच फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर उपस्थित 66 हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला...टीम इंडियाचे खेळाडूही आनंदात मश्गुल झाले...!! भारताने या लढतीत विजय मिळवला तरीही पाकनेच ही मालिका 2-1 ने जिंकली. या सामन्यात भारताकडून युवा खेळाडू भुवनेश्वरकुमार, शमी अहमद, ईशांत शर्मा या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने शानदार प्रदर्शन केले. ऑफस्पिनर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनीसुद्धा जबरदस्त गोलंदाजी करून धोनीला विजयाची भेट दिली. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी धोनी तर प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी नासेर जमशेद ठरला.

भारतीय गोलंदाज चमकले - फिरोजशहा कोटलाच्या मैदानावर कडाक्याच्या थंडीत प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय फलंदाजांनी 43.4 षटकांत 167 धावांतच गुडघे टेकले. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. मात्र, आपल्या गोलंदाजांनी पाकला 48.5 षटकांत 157 धावांत रोखून संस्मरणीय विजय मिळवला. पाकिस्तानला विजयासाठी फक्त 168 धावा काढायच्या होत्या. पहिल्या दोन वनडेत पाक फलंदाजांनी ज्या विश्वासाने फलंदाजी केली, त्यानुसार हा स्कोअर त्यांच्यासाठी सहज वाटत होता. मात्र, धोनीने हार न मानता आपल्या युवा खेळाडूंना विजयासाठी प्रेरित केले. भुवनेश्वरने आपल्या आऊट आणि इनस्विंगच्या चेंडूवर कामरान अकमल आणि युनूस खानला बाद केले. शमी अहमदने 138 कि.मी. वेगाने गोलंदाजी करताना एक विकेट घेतली. शमीने तब्बल चार षटके निर्धाव टाकली. पदार्पणाच्या सामन्यात चार मेडन ओव्हर टाकण्याचा हा बहुधा विक्रम असावा.

धोनीचे चाणाक्ष नेतृत्व - पाक टीम चांगल्या स्थितीत होती. पाकच्या 61 धावांत 3 विकेट होत्या. मात्र, पुढच्या 97 धावांत त्यांनी 7 विकेट गमावल्या. धोनीने चतुराईने गोलंदाजांचा उपयोग केला. भारतीय गोलंदाजांनी एकूण 9 षटके निर्धाव टाकली आणि पाक फलंदाजांवर दबाव निर्माण केला. पाकच्या फलंदाजांना संरक्षणात्मक खेळ करण्यास आपल्या गोलंदाजांनी भाग पाडले. पाककडून कर्णधार मिसबाह-उल-हकने सर्वाधिक 39 तर मागच्या दोन सामन्यात शतक ठोकणा-या नासेर जमशेदने 34 आणि उमर अकमलने 25 धावा काढल्या. मो. हफिजने 21 धावांचे योगदान दिले. बोटाला दुखापत झाल्यामुळे तो सलामीला खेळण्यास आला नाही.

भारतीय फलंदाज पुन्हा ढेपाळले - तत्पूर्वी, भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय टॉप ऑर्डर पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच या लढतीतही ढेपाळले. भारताची संपूर्ण टीम 50 षटकेसुद्धा खेळू शकली नाही. पाक गोलंदाजांनी पहिल्या तीन विकेट अवघ्या 37 धावांत घेतल्या होत्या. सर्व फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. कर्णधार धोनीने एका टोकाने काही आकर्षक फटके मारले. त्याने मो. हफिजला तीन षटकार मारले. धोनीने सर्वाधिक 36 धावा काढल्या. सुरेश रैनाने 31 आणि रवींद्र जडेजाने 27 तर युवराजसिंगने 23 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचे सहा फलंदाज तर दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठू शकले नाहीत. धोनी आणि रैना यांनी पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली.

दोन वर्षांत पहिल्यांदा धोनी बाद झाला - हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल. मात्र, हे सत्य आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कर्णधार धोनीने वन डेत पहिल्यांदा मायभूमीत आपली विकेट गमावली. योगायोगाने धोनी शेवटच्या वेळी मोहाली येथे पाकविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात बाद झाला होता. त्यानंतर तो सलग आठ डावात नाबाद राहिला. त्याने नऊ डावात 506 धावा काढल्या. या दरम्यान, त्याने अजमलचा झेल घेत एकदिवसीय सामन्यांत आपले 200 झेल पूर्ण केले.

Next Article

Recommended