आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs South Africa Second One Day Cricket Match Today

प्रत्युत्तर की पुन्हा पराभव? आज रंगणार दुसरा वनडे सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बन- भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना रविवारी डर्बनला खेळवला जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिली लढत जिंकून आफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. डर्बन येथे दुसरा सामना जिंकून टीम इंडिया आफ्रिकेला तोडीस तोड उत्तर देणार की पुन्हा लाजिरवाणा पराभव होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या वनडेबाबत बोलायचे झाल्यास त्या सामन्यात टीम इंडियाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. सलग सहा वनडे मालिका जिंकून टीम इंडिया आफ्रिकेत आली आहे, असे जोहान्सबर्गमध्ये खेळाडूंची कामगिरी आणि देहबोलीवरून मुळीच वाटले नाही. भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई झाली. नंतर फलंदाज आफ्रिकन गोलंदाजांपुढे हतबल दिसले.
फलंदाज अपयशी
गेल्या काही मालिकांमध्ये धावांचा डोंगर उभे करणारे तीन आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली जोहान्सबर्ग येथे स्वस्तात बाद झाले. युवराजसिंगला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही. सुरेश रैनासुद्धा 14 धावा काढून चालता झाला. 359 धावांचा पाठलाग करणारा भारतीय संघ 217 धावांत ढेपाळला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 65 धावा वगळल्या, तर उर्वरित फलंदाजांनी मिळून 152 धावांचे योगदान दिले.
आफ्रिकेने केले पुनरागमन
आफ्रिकेबाबत बोलायचे झाल्यास पाकिस्तानविरुद्ध मायदेशात वनडे मालिका गमावल्यानंतर भारताविरुद्ध त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले. आफ्रिकन फलंदाज खोर्‍याने धावा काढत असून गोलंदाजही आग ओकत आहेत. आता मालिका विजयासाठी आफ्रिकन खेळाडू झुंज देतील.
यजमान आफ्रिकेची उजवी बाजू
0 पाकविरुद्ध पराभव विसरून टीम पुन्हा लयीत
0 कॉक, डिव्हिलियर्स, ड्युमिनी, आमला फॉर्मात
0 स्टेन, मोर्केलच्या रूपाने दमदार गोलंदाजी
0 घरच्या मैदानावर खेळण्याचा होणार फायदा
0 वेगवान खेळपट्टय़ांवर खेळण्याचा अनुभव
टीम इंडियाची दुबळी बाजू
0 आफ्रिकन खेळपट्टय़ांवर फलंदाज दबावात 0 युवा त्रिमूर्ती रोहित, धवन, कोहली ठरले फ्लॉप
0 एकही गोलंदाज लयीत नाही; सर्वांना बदडले
0 डेल स्टेन, मोर्केलचे उत्तर आपल्याकडे नाही
0 क्षेत्ररक्षणही ठरले होते सुमार दर्जाचे
धोनीसाठी गोलंदाजी असेल चिंतेचा विषय
भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकात धावा रोखण्याऐवजी धावांचा पाऊस पाडण्यास आफ्रिकन फलंदाजांना मदत केली. अखेरच्या काही षटकांत धावा देण्याची टीम इंडियाची दुबळी बाजू अजून दुरुस्त झालेली नाही. यावर अधिक मेहनतीची गरज आहे, असे धोनीने म्हटले आहे. मागच्या सामन्यात आफ्रिकन फलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत 100 धावा जोडल्या. पहिल्या वनडेत रवींद्र जडेजाला वगळता उर्वरित सर्व गोलंदाज अपयशी ठरले. मोहित शर्माच्या जागी या वेळी उमेश यादव किंवा ईशांत शर्माला अंतिम अकरामध्ये संधी मिळू शकते.
सुधारणा आवश्यक
टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करायचे असेल तर खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीय खेळाडूंना कामगिरी सुधारावी लागेल. भारताला मधल्या फळीत युवराजसिंग आणि सुरेश रैना यांनी निराश केले आहे. त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. परिस्थितीनुसार खेळ करण्यात धोनी तरबेज आहे.
संभाव्य संघ
भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराजसिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, मो. शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका : एल्बी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला, डी. कॉक, ज्ॉक कॅलिस, जे.पी. ड्युमिनी, डेव्हिड मिलर, वेर्नोन फिलेंडर, डेल स्टेन, एम. मोर्केल, इम्रान ताहीर, आर. मॅग्लारेन, त्सोत्सोबे.