आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदिरमन चषकात भारतापुढे आज कोरियाचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंग्गून (चीन)- स्टार शटलर सायना नेहवाल व के. श्रीकांत यांच्या नेतृत्वातील भारतीय बॅडमिंटन संघाला आज प्रतिष्ठेच्या सुदिरमन चषक स्पर्धेत ‘वन डी’ गटात तीन वेळच्या विजेत्या तगड्या द. कोरियाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
२०११ मध्ये भारताने या स्पर्धेच्या बाद फेरीत धडक दिली होती. मात्र, यंदा पहिल्याच सामन्यात मलेशियाकडून भारताला ३-२ ने अपयश सहन करावे लागले. यानंतर जर पराभव पदरी आला, तर उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधीच भारताच्या हातून निसटेल.
त्यामुळेच दक्षिण कोरियाविरुद्धची लढत भारतासाठी करा किंवा मरा अशी आहे. कोरियाला नमवणे अवघड असले, तरी अशक्य नाही. या संघात जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पाचव्या स्थानावरील वॅन हो सन, सातव्या स्थानावरील महिला शटलर संग जी ह्यून आहेत. पुरुष व महिला एकेरीत यांच्याशी भारतीय अग्रणी बॅडमिंटनपटूंना दोन हात करावे लागतील. श्रीकांत व सायनाने भारताला पहिले दोन्ही एकेरीचे सामने जिंकून दिले, तर महिला दुहेरीत ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्यपदक जिंकून देणारी जोडी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचे काम सोपे होईल. या दोघींनाही विश्व क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील जोडी ली सो ही-शिन सेउंग चान यांच्याशी महिला दुहेरीत झुंजावे लागेल.

जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित ली योंग डाए-येओन सेओंग ही जोडी पुरुष दुहेरीत अन् आठव्या स्थानावरील को संग ह्यून-किम हा ना ही जोडी मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंची परीक्षा घेतल्याशिवाय राहणार नाही.

सुदिरमन चषकाचे स्वरूप
सुदिरमन चषकात ३५ संघांचा चार गटांत समावेश केला जातो. अग्रमानांकित १२ संघांचा पहिल्या गटात समावेश असतो. हे संघ चषकासाठी झुंजतात, तर दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या गटातील संघ रँकिंग मिळवण्यासाठी एकमेकांशी लढत देतात.
बातम्या आणखी आहेत...