आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Will Start World Cup Journey By Practice Match On Sunday

विश्वचषकाची रंगीत तालीम, रविवारी सराव सामन्याद्वारे भारत करणार मोहीमेला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या भूमीवर व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर क्रिकेटचा कुंभमेळा भरतोय. त्याआधी होत असलेले सराव सामने हे या सोहळ्याची रंगीत तालीम ठरणार आहेत. प्रत्येक संघाला आपल्या शक्तिचा अंदाज घेण्याची ही शेवटची संधी असेल. या संधीनंतर बदल करण्यासारखे फारसे काही हातात शिल्लक राहणार नसले तरी, प्रत्यक्ष सामने सुरू झाल्यानंतरची रणनीती त्यावरून आखता येणार आहे.

भारत विश्वचषकाचा गतविजेता आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आणि त्यापेक्षाही अधिक प्रतिष्ठेची असणार आहे. भारत दोन सराव सामने खेळणार आहे. त्यात एक ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाबरोबर आणि दुसरा अफगाणिस्तानसारख्या कमकुवत संघाबरोबर. त्यामुळे कॅप्टन कूल धोनी आणि संघ व्यवस्थापनाला आगामी दीड महिन्याच्या या युद्धासाठी नेमकी काय तयारी करायची ते ठरवता येणार आहे.
पहिलाच सामना भारताचा
सराव सामन्यांची सुरुवातच भारताच्या सामन्याने होणार आहे. भारताच्या समोर उभा आहे बलाढ्य ऑस्ट्रेलिया. तसं पाहता सराव सामने आत्मविश्वास दुणावण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. पण त्याच्या अगदी उलटे होण्याची भीतीही आहेच. त्यात नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत भारताची झालेली अवस्था आणि त्याआधी कसोटी मालिकेत याच कांगारुंनी भारताच्या जिव्हारी मारलेल्या ओरखड्यांच्या जखमा अजून ताज्या आहेत. सराव सामन्यातही सर्वात आधी त्यांच्या तोंडाला तोंड द्यायचे. पण ऑस्ट्रेलियाचा जशास तसे उत्तर देण्याची क्षमताही आपल्यात आहेच. त्याची प्रणिती अनेकदा आलेली आहे. त्यात विश्वचषकाचा माहोल भारताच्या या वाघांना बळकटी देईल अशीही आशा आहे. त्यामुळे धोनीसेनेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे.

दुखापतींची चिंता
रोहीतसारखा तडाखेबाज सलामीवीर, जडेजासारखा अष्टपैलू आणि भुवनेश्वर तसेच इशांत शर्मा हे मोजक्या वेगवान गोलंदाजांपैकी दोघे. भारताच्या विश्वचषक खेळणाऱ्या 16 रत्नांपैकी हे चौघे दुखापतींनी बेजार झाले आहेत. त्यामुळे या चौघांच्या फिटनेसचीही या सामन्यात चाचणी होत आहेत. युवराजच्या चाहत्यांचेही यांच्या फिटनेसकडे चांगलेच लक्ष आहे.

सामन्याचे महत्त्व
ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर खेळत आहे. त्यात तिरंगी मालिका आणि भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेने ते आत्मविश्वासाने खच्चून भरलेले असणारच. पण भारतासाठी हा सामना म्हणजे संजीवनीचे काम करणारा ठरू शकतो. प्रत्यक्ष सामने 14 तारखेला सुरू होत असले तरी, भारतासाठी या सामन्यानेच विश्वचषक स्पर्धेचा प्रवास सुरू होणार आहे. तसेच काय चुका होतात हे पाहण्यासाठी आणखी एक शेवटची संधीही या सामन्यामुळे मिळणार आहे.
विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यापूर्वीचे आणि नंतरचे विश्लेषण वाचा divyamarathi.com वर.