आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदिवसीय मालिका: टीम इंडियाची मालिकेत बरोबरी, विंडीजचा ४८ धावांनी पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सामनावीर मो. शमी (४/३२), रवींद्र जडेजा (३/४४) आणि अमित मिश्रा (२/४०) यांनी केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने शनिवारी वेस्ट इंडीजचा दुस-या एकदिवसीय सामन्यात ४८ धावांनी पराभव केला. यासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आता मालिकेतील तिसरा वनडे १४ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे होईल. कोची येथील सलामी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुस-या वनडेत विंडीजला नमवून भारताने विजयी ट्रॅकवर आल्याचे संकेत दिले.
दीर्घ प्रतीक्षेनंतर फॉर्मात आलेला विराट कोहली (६२) आणि सुरेश रैना (६२) यांच्या शानदार शतकी भागीदारीच्या भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात २६३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात पाहुण्या विंडीजने ४६.३ षटकांत २१५ धावा करून आपला गाशा गुंडाळला.

स्मिथची झुंज व्यर्थ : विंडीजकडून सलामीवीर स्मिथने एकाकी झुंज दिली. त्याने सलामीवीर डॅरेन ब्राव्होसोबत (२६) संघाला ६४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, ब्राव्होला त्रिफळाचीत करून मो. शमीने ही जोडी फोडली. त्यानंतर स्मिथने तिस-या क्रमांकावर आलेल्या पोलार्डसोबत संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुस-या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा दावा मजबूत केला. दरम्यान, शमीने स्मिथला बाद करून विंडीजच्या विजयाच्या प्रयत्नावर पाणी फेरले. स्मिथने ९७ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि दोन षटकारांच्या साहाय्याने संघाकडून सर्वाधिक ९७ धावा काढल्या.

टेलरचे बळींचे शतक
विंडीजकडून टेलरने दहा षटकांत ५४ धावा देत तीन गडी बाद केले. रैनाला बाद करून टेलरने बळींचे शतक पूर्ण केले. आता त्याचे १०० बळी पूर्ण झाले आहेत. हे शतक पूर्ण करणारा तो १५ वा कॅरेबियन खेळाडू ठरला.

धोनीच्या ‘हेलिकॉप्टर’ने चाहते खुश
दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवरील उपस्थित चाहत्यांना भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या ‘हेलिकॉप्टर’ शॉटने जल्लोषाची संधी दिली. या वेळी चाहत्यांनी केलेली विशेष मागणीही त्याने पूर्ण केली.

कोहली - रैनाची भागीदारी
भारताला १८ व्या षटकांपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात ७४ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैनाने संघाचा डाव सावरला. या दोघांनी १९.१ षटकांत झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन करताना चौथ्या गड्यासाठी १०५ धावांची भागीदारी केली. धोनीने शेवटच्या पाच षटकांत फटकेबाजी करत नाबाद ५१ धावा काढल्या. फॉर्मात असलेल्या रैनाने चौकार व षटकारांची आतषबाजी करून ६० चेंडूंत ६२ धावा काढल्या.

मो.शमीचा चौकार
भारताच्या मोहंमद शमीने धारदार गोलंदाजी करताना बळींचा चौकार मारला. त्याने ९.३ षटकांत ३६ धावा देऊन शानदार चार बळी घेतले. त्याने सलामीवीर स्मिथ, डॅरेन ब्राव्हो, कर्णधार ड्वेन ब्राव्हो आणि रवी रामपालला बाद केले. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजाने नऊ षटकांत ४४ धावा देत तीन गडी बाद केले. तसेच अमित मिश्राने दोन आणि उमेश यादवने एक गडी बाद केला.