आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा ओमानवर 8-0 ने दणदणीत विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह- मनदीपसिंगच्या तीन शानदार गोलच्या बळावर भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने ब गटात ओमानचा 8-0 ने धुव्वा उडवला.

दुबळ्या संघाविरुद्ध मनदीपने चौथ्याच मिनिटाला गोल करून भारताचे खाते उघडले. आपला पहिला सामना खेळत असलेल्या रमणदीपसिंगने 17 व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी 2-0 अशी केली. डिफेंडर व्ही.आर. रघूनाथने 28 व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. रुपिंदर पालसिंगने 34 व्या मिनिटाला पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करून हाफटाइमपर्यंत भारताची आघाडी 4-0 अशी केली. मनदीपने 40 व्या मिनिटाला आपला दुसरा आणि 44 व्या मिनिटाला तिसरा गोल करून भारताची आघाडी 6-0 अशी केली. याशिवाय मलकसिंगने 47 व्या आणि एस.के. उथप्पाने 69 व्या मिनिटाला गोल करून भारताला 8-0 असा विजय मिळवून दिला.

रमणदीपशिवाय निकिन तिमैयाने या सामन्यात भारताकडून आंतरराष्‍ट्रीय पर्दापण केले. भारताचा पुढचा सामना सोमवारी दक्षिण कोरियासोबत होईल. कोरियाने यापूर्वीच पुढच्या वर्षी हॉलंड येथे होणा-या वर्ल्डकपसाठी क्वालिफाय केले आहे. स्पर्धेत रविवार विश्रांतीचा दिवस आहे. भारतीय संघ ब गटात सोमवारी कोरियाशी दोन हात करून वर्ल्डकपच्या दिशेने आगेकूच करण्याचा प्रयत्न करेल.

पाककडून जपानचा धुव्वा
दुसरीकडे पाकिस्तानने आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानचा सलामी सामन्यात धुव्वा उडवला. या संघाने सामन्यात 7-0 अशा फरकाने विजय मिळवला. वकास (10,20 मि.). हसीम खान (22 मि.), मो. तौसिक (25, 34 मि.) मो. इम्रान (33, 69 मि.) यांनी सुरेख गोल करून पाकला सामन्यात एकतर्फी विजय मिळवून दिला. दमदार सुरुवात करताना पाकने दहाव्या मिनिटात सामन्यात गोलचे खाते उघडले. जपानच्या निराशाजनक कामगिरीचा फायदा घेत पाकने मध्यंतरापूर्वी, सामन्यात 6-0 ने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुस-या हाफमध्ये मोहंमद इम्रानने 69 व्या मिनिटाला मैदानी गोल करून संघाचा 7-0 ने विजय निश्चित केला.

मनदीपची हॅट्ट्रिक
आशिया चषकात प्रथमच खेळणा-या मनदीपसिंगने शनिवारी उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने ओमानविरुद्ध सलामीच्या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक केली. त्याने सामन्यात 4, 40 आणि 44 व्या मिनिटाला हॅट्ट्रिक नोंदवून संघाच्या आघाडीला मजबूत केले. मनदीपने सामन्यात चेंडूवर अप्रतिमरीत्या नियंत्रण राखले. मनदीपचे पासेस आणि वेगवान मूव्हमेंट भारतीय संघाला फायद्याची ठरली.