आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशिया चषकात भारताचा 2-0 ने विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इपोह- भारतीय संघाने सोमवारी गतविजेत्या दक्षिण कोरियाला 2-0 ने नमवून आशिया चषक हॉकी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. व्ही.आर.रघुनाथ (6 मि.) आणि 18 वर्षीय स्ट्रायकर मनदीपने (65 मि.) संघाला सामन्यात एकतर्फी विजय मिळवून दिला.


पुढच्या वर्षी होणा-या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या भारताने ब गटात दुसरा विजय मिळवला. भारताने यापूर्वी ओमानचा 8-0 ने पराभव केला होता.


वर्ल्डकपच्या तिकिटासाठी भारताला ही स्पर्धा जिंकणे आवश्यक आहे. कोरियाने यापूर्वीच विश्वचषकातील प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय युवा टीमसाठी चॅम्पियन कोरियाविरुद्ध सामना अग्निपरीक्षेसारखा होता. मात्र, यामध्ये भारताने स्वत:ला सिद्ध केले. भारताने दोन्ही हाफमध्ये प्रत्येकी एक गोल केला. रघुनाथने दमदार सुरुवात करताना सहाव्या मिनिटाला संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्याने पेनल्टी कॉर्नरवर सुरेख गोल केला. मनदीपने क्रॉसचा फायदा घेऊन प्रतिस्पर्धी कोरियाविरुद्ध गोल केला. मनदीपचा हा स्पर्धेतील चौथा गोल ठरला. त्याने यापूर्वी सलामीच्या सामन्यात ओमानविरुद्ध गोलची हॅट्ट्रिक केली होती. भारतीय फॉरवर्ड व मिडफील्डरने कोरियावर शेवटपर्यंत आपला दबदबा कायम ठेवला. तसेच भारताचा गोलरक्षक पी.आर. श्रीजेशने सुरेख कामगिरी केली. सामन्यात मिळालेल्या अनेक पेनल्टी कॉर्नरचा कोरियाला फायदा घेता आला नाही.


भारताची दुस-यांदा कोरियावर मात
भारतीय संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेत दुस-यांदा दक्षिण कोरियाला पराभूत केले. यापूर्वी 2007 मध्ये भारताने कोरियाविरुद्ध लढतीत 7-2 अशा फरकाने विजय मिळवला होता.


भारताचा तिसरा सामना बुधवारी
भारताचा गटातील अंतिम सामना आता बुधवारी बांगलादेशशी होणार आहे. ओमानचा सामना गतविजेत्या कोरियाशी होईल.