आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय बॉक्सिंग संघ सोफियाला रवाना, बल्गेरियात रंगणार 14 एप्रिलपासून स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एआयबीए वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपच्या आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये भारताने सातत्याने चढती कामगिरी केली आहे. बल्गेरियातील सोफियामध्ये येत्या 14 एप्रिलपासून सुरू होणार्‍या स्पर्धेत भारताचे 17 -18 वर्षांचे युवा मुष्टियोद्धा त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत.
भारतीय मुष्टियुद्ध संघटना आणि आंतरराष्ट्रीय संघटनेतील वाद विकोपाला पोहोचले असले तरी निदान त्या वादाचा परिणाम या युवा खेळाडूंना भोगावे लागणार नाहीत, हीच त्यातील जमेची बाजू आहे. या स्पर्धेत आपण नियमितपणे चांगली कामगिरी करीत आलो असून यंदा देखील चांगलीच कामगिरी करू, असा विश्वास प्रशिक्षक जी. मनोहरन यांनी व्यक्त केला आहे. 2010 मध्ये विकास कृष्णनला सुवर्ण, शिवा थापाला रौप्यपदक मिळाले होते. दोन वर्षापूर्वी आर्मेनियात झालेल्या जागतिक स्पर्धेत संघाने 1 रौप्य आणि 2 दोन कांस्यपदके मिळवली होती. यंदाच्या वर्षी आतापर्यंतची सर्वाधिक श्रेष्ठ कामगिरी करण्याचा विश्वास वाटतो. भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य भक्कम असून ते चांगला खेळ करण्यावर भर देणार आहेत. परिणाम काहीही झाला तरी सर्वोत्तम खेळ करायचा हेच ध्येय ठेवून खेळाडू रिंगणात उतरणार असल्याचेही मनोहरन यांनी नमूद केले.

संघातील खेळाडू
संघात श्यामकुमार, गौरव सोळंकी, एस.कार्तिक, संदीप कुमार, नीरज प्रसार, मनजित, नीलकमल यांचा समावेश आहे. संघाचे प्रशिक्षक म्हणून जी. मनोहरन काम पाहतील. गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबाद येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू होते.