आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricket Team Go South Africa Only 25 Days ?

भारताचा द. आफ्रिका दौरा 25 दिवसांपुरता र्मयादित?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट युनियनचे अध्यक्ष ख्रिस नेन्झानी यांनी मुंबईत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन, सचिव पटेल व अन्य पदाधिकार्‍यांची भेट घेतली.

या भेटीत भारताने आपला प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. त्यावर आपण दोन दिवसांत विचार करून बीसीसीआयला कळवू, असे नेन्झानी यांनी सांगितल्याचे कळते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने 25 दिवसांच्या दौर्‍याचा प्रस्ताव ठेवला आहे. हारुण लॉर्गट या बीसीसीआयविरुद्ध भूमिका घेणार्‍या अधिकार्‍याच्या नियुक्तीपासून बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाशी असहकाराची भूमिका घेतली होती. बीसीसीआयचे अध्यक्ष- एन. श्रीनिवासन अध्यक्षपदावर पुन्हा येणार नाहीत, अशी शक्यता गृहीत धरून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानेही प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केली. मात्र, पुरस्कर्ते आणि टेलिव्हिजन प्रक्षेपण हक्क विकत घेणार्‍या कंपन्यांनी तगादा लावल्यामुळे दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डालाही नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले. त्यांनी बीसीसीआयच्या पूर्व परवानगीशिवाय 3 कसोटी, 7 एकदिवसीय सामने व ट्वेन्टी-20 सामन्यांचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला बीसीसीआयने आक्षेप घेतल्यानंतर आज प्रथमच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातर्फे भारतीय बोर्डाशी अधिकृतरीत्या बोलणी झाली.

25 दिवसांच्या अवधीत दोन कसोटी सामने बसवायचे आणि 3 किंवा 5 एकदिवसीय सामन्यांसाठी प्रयत्न करायचे, असा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न आहे. मात्र, 3 कसोटी व 3 एकदिवसीय सामन्यांवरदेखील तडजोड होऊ शकते, अशी चर्चा आहे.

एन. श्रीनिवासन यांना विरोध करणार्‍या आय. एस. बिंद्रा यांनी दक्षिण आफ्रिका बोर्डाला आश्वासन दिल्यामुळे यापूर्वीच कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र, लॉर्गट यांच्या नियुक्तीमागेही बिंद्रा यांचाच हात असल्याची भावना आहे.


समीकरणात झाला बदल
एन. श्रीनिवासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळात पुन्हा सत्तेवर येताक्षणीच सारी समीकरणे बदलली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नरमाईचे धोरण स्वीकारून आपल्या अध्यक्षांना श्रीनिवासन यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. येत्या मंगळवारपर्यंत दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचे उत्तर अपेक्षित आहे. यापूर्वी बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळातील वाद चव्हाट्यावर आला होता.