आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Cricketer Mohamad Shami Exposes The West Indies' Vulnerability

मो. शमीचे शानदार पदार्पण; विंडीजचा धुव्वा; भारताला मोठा स्कोअर करण्याची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- मोहंमद शमीने शानदार कसोटी पदार्पण करताना बुधवारी वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चार गडी बाद केले. त्याने एकाला धावबादसुद्धा केले. त्याच्या दमदार प्रदर्शनापुढे कॅरेबियन खेळाडू टिकले नाहीत. विंडीजचा पहिला डाव अवघ्या 234 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत भारताने बिनबाद 37 धावा काढल्या होत्या.

सचिन तेंडुलकरच्या निवृत्ती मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने वेगवान गोलंदाज मोहंमद शमी आणि युवा फलंदाज रोहित शर्मा यांना संधी दिली. या दोघांनी कसोटी पदार्पण केले. वेस्ट इंडीजकडून वेगवान गोलंदाज शेल्डन कॉड्रेलने पदार्पण केले. इडन गार्डनवर सुरू असलेल्या सचिनच्या 199 व्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वरकुमारने धोकादायक सलामीवीर क्रिस गेलला अवघ्या 18 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतवले. गेलच्या रूपाने भारताला मोठे यश मिळाले. त्या वेळी विंडीजच्या 34 धावाच झाल्या होत्या. 15 व्या षटकात शमीने दुसरा सलामीवीर केरोन पॉवेलला (28) तंबूचा रस्ता दाखवला. पॉवेलने 40 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार आणि 1 षटकार मारला. शमीच्या उसळत्या चेंडूला मारण्याच्या नादात पॉवेलचा उडालेला झेल भुवनेश्वरकुमारने टिपला.

मार्लोन सॅम्युअल्सचे अर्धशतक
वेस्ट इंडीजची टीम 2 बाद 47 अशी संकटात सापडली असताना मधल्या फळीचा फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सच्या (65) अर्धशतकाने संघाचा डाव सावरला. सॅम्युअल्सने डॅरेन ब्राव्होसोबत तिसर्‍या विकेटसाठी 91 धावांची मजबूत भागीदारी केली. जेवणाच्या ब्रेकपर्यंत वेस्ट इंडीजचा स्कोअर 2 बाद 107 धावा असा चांगला होता. ब्राव्हो आणि सॅम्युअल्स दोघेही खेळपट्टीवर स्थिरावलेले दिसत होते.

सचिनच्या गोलंदाजीला चाहत्यांचा पाठिंबा
भारतीय गोलंदाजांनी चाहत्यांना सामन्याचा आनंद लुटण्याची पूर्ण संधी दिली. एखादी विकेट पडली किंवा सचिनकडे चेंडू जाताच स्टेडियम चाहत्यांच्या आवाजाने निनादून जात होते. मात्र, सर्वाधिक आवाज तर टी ब्रेकच्या आधी झाला. त्या वेळी कर्णधार धोनीने गोलंदाजीसाठी चेंडू सचिनच्या हाती सोपवला. सचिननेसुद्धा धोनी आणि चाहत्यांना निराश केले नाही. त्याने चौथ्याच चेंडूवर शिलिंगफोर्डची विकेट घेतली. त्याला पायचीत करून सचिनने विकेट काढली. सचिनने विकेट घेताच तमाम चाहत्यांनी सचिऽऽन.. सचिऽऽन.... अशी नारेबाजी करून त्याला जोरदार समर्थन दिले.

सचिनने बघितले 94 खेळाडूंचे कसोटी पदार्पण
मो. शमी आणि रोहित शर्माने कसोटी पदार्पण केले. दोघे देशाकडून कसोटी खेळणारे अनुक्रमे 279 आणि 280 वे खेळाडू ठरले. विशेष म्हणजे यातील तब्बल 94 खेळाडूंनी सचिनसमोर पदार्पण केले. सचिनने 1989 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. त्याच्या आधी 185 खेळाडू कसोटीत खेळले होते. या वेळी सचिन वयाच्या चाळिशीत कसोटी खेळणार्‍या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. यापूर्वी आरजेडी जमशेदजी, सी. के. नायडू, सी. रामास्वामी, विजय मर्चंट, लाला अमरनाथ व विनू मंकड यांनी अशी कामगिरी केली.

धावफलक
वेस्ट इंडीज पहिला डाव धावा चेंडू 4 6
गेल झे. विजय गो. भुवनेश्वर 18 32 4 0
पॉवेल झे. भुवनेश्वर गो. शमी 28 40 5 1
डॅरेन ब्राव्हो धावबाद 23 96 2 1
सॅम्युअल्स त्रि. गो. शमी 65 98 11 2
चंद्रपॉल त्रि. गो. अश्विन 36 79 3 0
रामदीन त्रि. गो. शमी 04 04 1 0
सॅमी झे. भुवनेश्वर गो. ओझा 16 19 3 0
शिलिंगफोर्ड पायचीत गो.सचिन 05 39 0 0
परमॉल झे. व गो. अश्विन 14 27 3 0
टीनो बेस्ट नाबाद 14 30 2 0
कॉट्रेल त्रि. गो. शमी 0 4 0 0
अवांतर : 11. एकूण : 78 षटकांत सर्वबाद 234 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-34, 2-47, 3-138, 4-138, 5-143, 6-172, 7-192, 8-211, 9-233, 10-234. गोलंदाजी : भुवनेश्वर 14-6-33-1, मो. शमी 17-2-71-4, आर. अश्विन 21-9-52-2, प्रज्ञान ओझा 24-6-62-1, सचिन तेंडुलकर 2-1-5-1.
भारत पहिला डाव धावा चेंडू 4 6
शिखर धवन खेळत आहे 21 27 4 0
मुरली विजय खेळत आहे 16 45 2 0
अवांतर : 0. एकूण : 12 षटकांत बिनबाद 37. गोलंदाजी : टिनो बेस्ट 2-0-15-0, एस. कॉट्रेल 5-2-13-0, एस. शिलिंगफोर्ड 4-2-8-0, व्ही. परमॉल 1-0-1-0.