नवी दिल्ली - सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघ बुधवारी युरोप दौर्यावर रवाना होणार आहे. हॉलंडच्या या दहादिवसीय दौर्यात भारतीय संघ पाचपेक्षा अधिक सराव सामने खेळणार आहेत.
या दौर्यासाठी भारतीय संघात गुरबाज सिंगसह दानिश मुज्तबाला संधी देण्यात आली आहे. मात्र, इंडिया हॉकी लीगममध्ये सर्वाधिक गोल करणार्या संदीप सिंगला डच्चू देण्यात आला.
तसेच मुंबईचा युवराज वाल्मीकीही या दौर्यात भारतीय संघात सहभागी झालेला आहे. त्याच्यासह डिफेंडर गुरिंदर सिंग, मिडफील्डर देविंदर वाल्मीकी आणि स्ट्रायकर ललित उपाध्यायलाही 21 सदस्यीय भारतीय संघात स्थान देण्यात आले. पी.आर. श्रीजेश आणि हरज्योत सिंगच्या रूपाने भारतीय संघात दोन गोलरक्षक आहेत.
या 9 ते 19 एप्रिलदरम्यान होणार्या दौर्यात भारतीय संघ पाच सराव सामने खेळणार आहे. यात भारताचा पहिला सराव सामना 11 एप्रिलला राष्ट्रीय क्लब लिडेनशी होईल. त्यानंतर 14 एप्रिलला भारत आणि एचजीसी क्लब समोरासमोर असतील. 15 एप्रिलला भारताची गाठ बेल्जियमशी पडेल. त्यानंतर 17 आणि 19 एप्रिल रोजी भारत आणि हॉलंड यांच्यात सामने रंगणार आहेत.