इंचियोन - पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला १७ व्या एशियन गेम्सच्या हॉकीतील रोमांचक फायनलमध्ये पेनॉल्टी शूटआऊटवर पराभूत करून भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला. पाकला फायनलमध्ये ४-२ ने पराभूत करून भारताने तिस-यांदा या स्पर्धेत सुवर्ण जिंकले.
यापूर्वी भारताने १९६६ आणि १९९८ मध्ये सुवर्ण जिंकले होते. भारताच्या या यशासोबत रिओ ऑलिम्पिकला थेट प्रवेश मिळाला आहे. भारताने १९६६ नंतर प्रथमच एशियाडच्या फायनलमध्ये पाकिस्तानला हरवले. निर्धारित वेळेत सामना १-१ ने बरोबरीत सुटल्यानंतर सामना पेनॉल्टी शूटआऊटवर गेला. सामन्याच्या या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी भारतीय हॉकीपटूंनी जबरदस्त मानसिक मजबुतीचा परिचय देताना पाकला पराभूत केले. याशिवाय भारतीय महिलांनी ४ गुणे ४०० मीटर रिलेत सुवर्ण जिंकले. बॉक्सिंगमध्ये दोन कांस्य, तर गोळाफेकीत एक कांस्य गुरुवारी भारताने मिळवले.
भारत आणि पाकिस्तान तब्बल ३२ वर्षांनंतर एशियन गेम्सच्या फायनलमध्ये समोरासमोर होते. या विजयासह भारताने या स्पर्धेतील साखळीत पाककडून २-१ ने झालेल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला. यापूर्वी भारताला १६ वर्षांपूर्वी बँकॉक एशियन गेम्समध्ये हॉकीत सुवर्ण जिंकले होते. त्या वेळी धनराज पिल्ले कर्णधार होता.
पहिल्या सत्रात पाक पुढे :
सामना सुरू होताच पाक संघाने भारतावर आक्रमण केले. पाकने तिस-या मिनिटालाच सामन्यात १-० ने आघाडी घेतली. पाककडून मो. रिझवानने पहिला गोल केला. पहिल्या सत्रात पाकच्या डिफेन्स आणि फॉरवर्ड यांनी भारताच्या तुलनेत सरस खेळ केला.
दुस-या सत्रात बरोबरी : सामन्याच्या दुस-या सत्रातील २३ व्या मिनिटाला भारताला बरोबरीची संधी मिळाली. भारताच्या रूपिंदरपाल सिंगच्या रॉकेट फ्लिक शॉटला पाकच्या इम्रान बटने रोखले. थोड्या वेळाने भारताच्या कोटजितने गोल करून भारताला १-१ ने बरोबरी करून दिली. तिस-या आणि चौथ्या सत्रात गोल झाले नाहीत. अखेर सामना पेनॉल्टी शूटआऊटवर गेला.
ऑलिम्पिक प्रवेश
या विजयानंतर भारतीय हॉकी संघाने २०१६ मध्ये होणा-या रिओ ऑलिम्पिकच्या हॉकीमध्ये थेट प्रवेश केला आहे.
क्रमवारीत भारत पुढे
भारतीय संघ सध्या वर्ल्ड रँकिंगमध्ये नवव्या, तर पाक अकराव्या स्थानी आहे. दोन्ही संघांत आतापर्यंत १६० सामने झाले असून यात भारताने ५३ आणि पाकने ७९ सामने िजंकले. २८ सामने ड्रॉ झाले.
भारत-पाक आकडेवारी
एशियन गेम्समध्ये भारत-पाकमध्ये १४ सामने झाले. यात भारताने ४ तर पाकने ८ सामने जिंकले. दोन सामने ड्रॉ झाले. एशियन गेम्सच्या फायनलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत ९ वेळा समोरासमोर आले. यात भारताने २ तर पाकने ७ वेळा विजय मिळवला आहे.
१६ वर्षांपूर्वी भारताने एशियाड क्रीडा स्पर्धेच्या हॉकीत सुवर्णपदक पटकावले होते.
पेनॉल्टी शूटआऊटचा रोमांच
भारत पाकिस्तान
आकाशदीप सिंग, गोल (१-०) अब्दुल खान ००
रूपिंदरपाल सिंग, गोल (२-०) वकास, गोल(२-१)
मनप्रीत सिंग, फाऊल मो. उमर ००
बीरेंद्र लाकडा, गोल (३-१) भुट्टा, गोल (३-२)
धरमबीर सिंग, गोल (४-२) ----
पुढे वाचा... महिला रिले संघाला सुवर्णपदक