आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Man And Woman Kabbadi Team Won Gold Medals, Divya Marathi

भारताची गोल्डन विजयादशमी कबड्डीत भारतीय महिला, पुरुष संघाला सुवर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : इंचियोन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सलग दुस-यांदा सुवर्णपदकाचा बहुमान पटकावल्यानंतर भारताच्या महिला खेळाडूंनी चाहत्यांना अभिवादन करून आनंदोत्सव साजरा केला.
इंचियोन - भारतीय संघातील खेळाडूंनी पारंपरिक खेळ कबड्डीतील आपला दबदबा कायम ठेवताना शुक्रवारी १७ व्या आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले. या सुवर्णपदकाने भारताच्या महिला आणि पुरुष संघाने विजयादशमी साजरी केली. यासह भारताने स्पर्धेत ११ व्या सुवर्णपदकाची कमाई केली.

भारताच्या दोन्ही कबड्डी संघांनी अंतिम सामन्यात इराणचा पराभव केला. राकेशकुमारच्या नेतृत्वाखाली पुरुष संघाने २७-२५ ने इराणला धूळ चारली. भारताने सलग सातव्यांदा फायनलमध्ये विजय मिळवला. यापूर्वी १९९०, १९९४, १९९८, २००२, २००६ आणि २०१० मध्येही भारताने अंतिम सामना आपल्या नावे केला होता. याच विजयाचा कित्ता गिरवत भारतीय महिला संघाने इराणला ३१-२१ ने पराभूत केले. भारतीय महिलांनी सलग दुस-यांदा अंतिम सामन्यात विजयश्री खेचून आणली.

कबड्डीत महाशक्ती म्हणून ओळखल्या जाणा-या भारतीय पुरुष संघाने अंतिम लढतीत खडतर आव्हानाचा सामना करताना विजय मिळवला. इराणविरुद्ध लढतीच्या पहिल्या हाफमध्ये भारतीय संघ १३-२१ ने पिछाडीवर पडला होता. यासह इराणच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, दमदार पुनरागमनासह भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पकड घेतली. यासह भारताने लढतीत २१-२१ ने बरोबरी साधली. त्यानंतर सलग गुणांची कमाई करताना भारताच्या पुरुष संघाने २७-२५ ने सामना जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले.
आम्ही इराणविरुद्ध थोड्या फरकाने जिंकलो. मात्र, आम्हाला सलग सातव्यांदा किताबावरचे वर्चस्व कायम ठेवता आले याचा आनंद आहे.

* राकेशकुमार, कर्णधार, भारतीय पुरुष कबड्डी संघ
पिछाडीनंतर मारली बाजी
भारतीय संघाने पहिल्या हाफमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही सामन्यात बाजी मारली. दरम्यान, राकेशसह जसबीरने चुरशीची खेळी करून विजय खेचून आणला.

दुखापतीनंतरही राकेशची झुंज
इराणविरुद्ध अंतिम सामन्यात कर्णधार राकेशकुमारला दुखापत झाली. मात्र, त्याने डाेक्याला पट्टी बांधून एकाकी झुंज देत विजयश्री खेचून आणली. या वेळी राकेशसह जसबीर सिंगनेही उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

इराण संघ सलग दुस-यांदा उपविजेता
इराणच्या पुरुष संघाला सलग दुस-यांदा आशियाई स्पर्धेत उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. यापूर्वी, २०१० ग्वांगझू आशियाई स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात इराण संघाला ३७-२० ने पराभूत केले होते. त्यापाठोपाठ आता इंचियोनमध्येही हरवले.

भारतीय महिलांचा शानदार विजय
ग्वांगझू येथे चार वर्षांपूर्वी भारतीय महिला संघाने आशियाई स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकावर नाव कोरले होते. याच किताबावरचे आपले वर्चस्व कायम ठेवताना महिला संघाने शानदार विजय मिळवला. दमदार सुरुवात करताना भारताच्या महिलांनी सामन्यावर पकड घेतली. भारताला पहिल्याच हाफमध्ये १५-११ अशी मोठ्या फरकाने आघाडी घेता आली. त्यानंतर भारताने दुस-या हाफमध्येही आघाडीची लय अबाधित ठेवली. महिला संघाची कर्णधार तेजस्विनी व ममताने चुरशीची खेळी करून भारताचा विजय निश्चित केला.

तायक्वांदो : मारिया, शालुकडून निराशा
उपांत्यपूर्व फेरीत पराभव
आशियाई स्पर्धेच्या तायक्वांदो प्रकारात भारताच्या मारिया मार्गरिटा रेगी आणि शालू रायकवारने निराशा केली. या दोन्ही खेळाडूंना महिला गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारताच्या दोन्ही खेळाडूंचे पदक मिळवण्याचे स्वप्न भंगले. महिलांच्या ७३ किलो वजन गटात शालूला कुवेतच्या एमएम अब्रार अल फहादने पराभूत केले. या वेळी शालूने शानदार झुंज दिली. मात्र, सरस खेळी करताना अब्रारने सामना आपल्या नावे केला. याशिवाय तिने उपांत्य लढतीत धडक मारली. तसेच मारियाला याच वजन गटाच्या दुस-या उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या डोंगहुआने धूळ चारली.

भारतीय व्हॉलीबॉल संघ पाचव्या स्थानी,
कतार संघाचा २-३ पराभव
भारतीय पुरुष संघाने आशियाई स्पर्धेत व्हॉलीबॉल प्रकारात पाचवे स्थान पटकावले. या वेळी भारतीय संघाने शुक्रवारी पाचव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत कतारचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. भारताने एक तास ४७ मिनिटे रंगलेल्या लढतीत विजय मिळवला. भारताच्या खेळाडूंनी २५-२१, २०-२५, २५-२२, २०-२५, १५-१० अशा फरकाने सामना जिंकला. भारताकडून प्रभाकरनने शानदार खेळी करताना १८ गुणांची कमाई केली. त्यापाठोपाठ गुरविंदरने २० व नवीन जेकबने संघाच्या विजयात १८ गुणांचे योगदान दिले. कतार संघासाठी
रेनन रिबेरोने, चिग्बो व इब्राहिमने केलेली खेळी व्यर्थ ठरली.
दोन तपांपासून कबड्डीत भारताचे वर्चस्व
पारंपरिक खेळ कबड्डीत भारताने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये मागील २४ वर्षांपासून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सलग सातव्या सुवर्णपदकाची कमाई करताना भारताच्या पुरुष संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. भारतीय पुरुष संघाने शुक्रवारी इराणचा पराभव करून हे सोनेरी यश संपादन केले. १९९० मध्ये आशियाई स्पर्धेत कबड्डी या खेळाचा समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून भारतीय संघ या खेळ प्रकारात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
१९९० पासून भारतीय संघाचा दबदबा
०९ सुवर्ण भारताच्या नावे
०७ सुवर्णपदके पुरुष संघाने जिंकली
०२ सुवर्णपदके महिलांनी पटकावली