आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी प्रशिक्षकांमुळे भारतीय खेळाडू डाेपिंगच्या विळाख्यात! मिल्खासिंगने ओढले ताशेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय प्रशिक्षकांमध्ये ऑलिम्पिकवीर घडवण्याची क्षमता आहे. विदेशी प्रशिक्षकांमुळे भारतीय खेळाडू डोपिंगच्या विळाख्यात सापडले अाहेत. शरीराची क्षमता वाढवण्यासाठी सप्लिमेंटच्या नावाखाली उत्तेजकद्रव्ये दिले गेल्याने खेळाडूंचे नुकसान झाले. लहान ते वरिष्ठ खेळाडूंपर्यत सर्वच जण डाेपिंगच्या अाहारी गेले असल्याचा घणाघात अाॅलिम्पियन प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंगने केला. क्रीडा संघटना व प्रशिक्षक इमानदारीने काम करत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
ते एका शाळेच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी शहरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून सुविधादेखील चांगल्या आहेत. मात्र चांगले प्रशिक्षक आणि प्रशासनाची अावश्यकता आहे. चीनप्रमाणे भारताने ऑलिम्पिक पदकाची दुरदृष्टी ठेवून प्रयत्न करायला हवे. राष्ट्रीय स्पर्धेतून चांगल्या खेळाडूंची निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांची भोजन, निवास, प्रशिक्षण आणि शिक्षणांची व्यवस्था सरकारने केली पाहिजे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सर्व क्रीडा संघटनांना एकत्र बोलावून त्या क्रीडा संघटनांच्या भविष्यातील ऑलिम्पिक कार्यक्रमाची माहिती घ्यावी. त्यानुसार पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे. पंतप्रधानाच्या बोलण्याने पदके मिळणार नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करायला पाहिजे, या बाबत चर्चा झाल्याचे मिल्खासिंग यांनी म्हटले.

मी ९० च्या जवळपास आहे. जगाचा निरोप घेण्यापूर्वी भारताला अॅथलेटिक्समध्ये आॅलिम्पिक पदक मिळालेले पाहायचे आहे, अशी भावनिक साद त्यांनी खेळाडूंना घातली. भारतात ग्रामीण भागामध्ये खरी गुणवत्ता असून ती शोधून काढण्याची गरज असल्याचे मिल्खासिंग यांनी म्हटले.

खेळाडूला क्रीडामंत्री करा, संघटनेत स्थान द्या
खेळाची जाण असलेल्या व्यक्तीला क्रीडामंत्री केले पाहिजे. ऑलिम्पिक रौप्य विजेता राज्यवर्धनसिंग राठोड यांना क्रीडा मंत्रिपद देण्यात यावे, अशी सूचना मी पंतप्रधान मोदींना केली होती. मात्र राठोड यांना दुसरेच मंत्रिपद देण्यात आले. संघटनांत खेळाडूंना संधी द्यायला हवी. यात राजकारण्याचे वर्चस्व अाहे. खेळाडू निवडणुकीतून त्यांचा सामना करू शकत नाहीत. निवडणूक चुकीच्या पद्धतीने होते, असे ते म्हणाले.

खेळामुळे मैत्री वाढते
भारत व पाकमध्ये तणावाचे वातावरण आहे. मुळात खेळामुळे मैत्री निर्माण होत असते. मी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. प्रत्यक्षात गेल्यानंतर मात्र वातावरण वेगळेच निर्माण झाले. तेथील सर्वांनी माझा आदर केला. अनेकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध झाले. खेळ आणि दहशतवाद या वेगवेगळ्या गोष्टी असून त्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. प्रत्येक देशासोबत खेळलेच पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...