अमरावती - अस्सल भारतीय खेळ मल्लखांबमधील चित्तथरारक कवायती, लाकडी खांबांवरील खेळाडूची कौशल्यपूर्ण कामगिरी अन् केवळ हात व पायाला पीळ देत साधला जाणारा तोल, या वैशिष्ट्यांमुळेच ‘इंडियन पोल’ने (मल्लखांब) जर्मनी, पोलंडसह युरोपवासीयांना चांगलीच मोहिनी घातली आहे.
जर्मनीतील सर्वच मुख्य शहरांमध्ये झालेल्या फायरवर्क्स ऑफ जिम्नॅस्टिक्स या शोअंतर्गत सुमारे 60 दिवस मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात इतर देशांच्या तुलनेत मल्लखांबला सर्वाधिक पसंती मिळाल्याची माहिती जर्मनीहून नुकतेच भारतात परतलेले मल्लखांबपटू मयूर दलालने दिली आहे. मयूरसोबत नरेंद्र गाडेनेही या शोमध्ये रोमांचक कसरती सादर करून वाहवा लुटली.
युरोप व भारताच्या क्रीडा संस्कृतीत फारच तफावत असून, ते आपल्यापेक्षा खेळांत मैल अन् मैल पुढे आहेत. तेथे खेळाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. शिक्षण जेवढे महत्त्वाचे, तेवढेच खेळही. खेळ अनिवार्य असल्यामुळे 40 ते 45 वर्षे वयापर्यंतचा प्रत्येकजण जर्मनी व युरोपात कोणत्या ना कोणत्या खेळात तरबेज असतो, असे मयूरने सांगितले.
युरोपियन्स कोणताही खेळ कौशल्याने खेळतात. तेथे खेळण्यासाठी वय आडवे येत नाही, अशी माहितीही मयूरने दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.
खेळाबद्दल कमालीचा प्रामाणिकपणा : जर्मनीसह युरोपात खेळाबद्दल कमालीचा प्रामाणिकपणा आहे. खेळाला सर्वस्व मानणारे अनेकजण भेटले. ते सतत 18 तास कसून सराव करतात. खेळात कुठेही भ्रष्टाचार नाही; पण व्यावसायिकता आहे. येथे स्पोर्ट्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होत असते. खेळाडूंनाही मुबलक पैसा मिळतो.
‘इंडियन पोल’च आहे सर्वोत्तम खेळ
मल्लखांबला तेथे ‘इंडियन पोल’ नावाने ओळखले जाते. या शोमध्ये भारतासह जपान, जर्मनी, चिली, कोलंबिया, चीन, कॅनडा आदी 15 देशांमधील जिम्नॅस्टिक्सशी संबंधित विविध खेळांचे प्रदर्शन घडवण्यात आले. त्यात भारतीय खेळ सर्वोत्तम ठरला. या खेळाचे व्हिडिओ युरोपात दाखवण्यात आली. माध्यमांनीही याची दखल घेतली.
19 शहरांमध्ये प्रदर्शन
जिम्नॅस्टिक्सचे मूळ असलेल्या ‘इंडियन पोल’ला जर्मनीत मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे 19 शहरांमध्ये मल्लखांबचे शो करण्यात आले. बर्लिन, ओल्डनबर्ग, हॅनोवर, क्रिमेन, डॉर्टमंड, हॅले, लेपझिग, कॅसल, बॅम्बर्ग, म्युनिच, नर्मबर्ग, फ्रँकफर्ट, वेट्झलर, बेलोफिलड, रोस्टॉक, केल, गॉटिंगन, मिंडेन, ब्राउंसवेग या शहरांमध्ये प्रात्यक्षिके झाली.