आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात क्रीडा सुविधांसाठी केंद्राकडून कोटीचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्र सरकारने देशातील प्रत्येक जिल्ह्यात अधिकाधिक क्रीडा सुविधा युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजीव गांधी क्रीडा अभियानांतर्गत ग्रामीण भागात १ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. देशभरात ग्रामीण भागात प्रत्येक ब्लॉकप्रमाणे एक अशी एकूण जवळपास ६५०० क्रीडा संकुले तयार करण्यात येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून खेळाडूंना उत्तम कामगिरीसाठी प्रोत्साहन देणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
तयार होणा-या नवीन संकुलात एकूण १३ खेळांचा समावेश असून यात स्थानिक ३ खेळ वाढवता येऊ शकतात. यात ११ इनडोअर आणि ५ आऊटडोअर खेळांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रात ३ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून हे क्रीडा प्रशिक्षक स्थानिक शाळांतील शारीरिक प्रशिक्षण दिलेल्या शिक्षकांमधून (पीटीई) निवडले जातील. त्यांच्यावर खेळाडूंच्या प्रशिक्षणाची व केंद्राच्या सुविधांची जबाबदारी असेल. यात एक प्रशिक्षक महिला असून एका प्रशिक्षकाला महिलांना स्वसंरक्षण देणे आवश्यक राहील. या प्रशिक्षण केंद्रांतर्गत होणा-या स्पर्धेसाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला असून विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंना बक्षीस देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आरजीकेए योजनेची वैशिष्ट्ये
* ग्रामीण ब्लॉकमध्ये एक याप्रमाणे ६५०० क्रीडा संकुलांची संकल्पना
* क्रीडा संकुलात ११ आऊटडोअर व ५ इनडोअर खेळ व व्यायामशाळा
* महिलांसाठी विशेष स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण
* प्रत्येक केंद्रात एक महिलासह ३ प्रशिक्षकांची नियुक्ती
* प्रत्येक क्रीडा संकुलासाठी १५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आधुनिक क्रीडा साधने पुरवली जातील.
* या योजनेत एकूण १६ खेळांची मर्यादा असल्याने त्यात स्थानिक तीन खेळांचा समावेश असेल.
योजनेतील खेळ : या योजनेत तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि स्थानिक व विभागीय क्रीडाप्रकार, व्यायामशाळा यांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्राला फायदा
या योजनेमुळे ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. तालुका क्रीडा संकुल निर्मितीला यात प्राधान्य आहे.
ऊर्मिला मोराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी