आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Super League Kerala Blasters Latest News In Marathi

इंडियन सुपर लीग : सचिनची ‘केरला ब्लास्टर्स’ मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - क्रिकेटवेड्यांच्या मुंबईतही फुटबॉल या खेळाची आवड शालेय जीवनात जपणार्‍या सचिन तेंडुलकरने ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल) या फुटबॉल लीगमध्ये केरळ फ्रँचायझीची सहमालकी स्वीकारली होती. आज सचिन तेंडुलकरने त्रिवेंद्रम येथे जाऊन आपल्या संघाचे कोचीचे ‘केरला ब्लास्टर्स’ असे नामकरण केले. केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी कोची संघाच्या ‘केरळा ब्लास्टर्स’ या नावाची घोषणा केली. केरळ राज्याच्या वतीने केरळचे मुख्यमंत्री चंडी आणि विरोधी पक्षाचे नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी सचिनला या वेळी राज्याच्या फुटबॉलला पाठिंबा द्यावा तसेच या खेळाचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन केले. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सचिनला या वेळी पुढील वर्षी केरळात होणार्‍या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या वेळी सदिच्छा राजदूत होण्याची विनंती केली. सचिन तेंडुलकरनेही केरळ राज्याच्या त्या विनंतीचा स्वीकार करताना म्हटले की, हा मी माझा एक प्रकारचा सन्मान समजतो. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सचिनला आपल्या दालनात निमंत्रित केले होते. विरोधी पक्षनेत्यांच्या निवासस्थानीही सचिन गेला होता. त्रिवेंद्रम विमानतळावर आणि केरळच्या सचिवालयात झालेल्या देदीप्यमान अशा स्वागताने सचिन तेंडुलकरही भारावून गेला. त्या वेळी बोलताना सचिन म्हणाला, ‘मी क्रिकेट खेळतच मोठा झालो असलो तरीही मला क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळही खेळायला आवडतात हे फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. मी हॉकी, फुटबॉल व बॅडमिंटनही खेळतो. कोची संघाच्या नावात ब्लास्टर हा शब्द जोडताना, आपल्याला अनेक जण मास्टर ब्लास्टर म्हणतात, त्यामुळे त्या शब्दाशी संघाचे नाव कदाचित जुळले गेले असावे, असे सचिनने सांगितले. लीगमुळे फुटबॉल खेळाच्या विकासाला खूपच मदत होईल असेही सचिनने या वेळी सांगितले.