आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन सुपर लीग: पुण्याकडून कोलकात्याचा धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पुणे एफसी संघाने शुक्रवारी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत यजमान अ‍ॅथलेटिको डी कोलकाता संघाचा धुव्वा उडवला. पुणे संघाने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला.

एम. डुडू (३५ मि.), कात्सो उरानिस (५५ मि.) आणि कोलोम्बा (८९ मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर पुणे संघाने शानदार विजयाची नोंद केली. कोलकाता संघासाठी फिकरू तेफेराने ८४ व्या मिनिटाला घरच्या मैदानावर एकमेव गोल केला. या धडाकेबाज विजयासह पुणे संघाने लीगच्या गुणतालिकेत तिस-या स्थानावर धडक मारली. या संघाचा लीगमध्ये हा तिसरा विजय ठरला. यासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता संघाचा विजयी चौकाराचा प्रयत्न धुळीस मिळाला. कोलकाता संघाचा हा लीगमधील पहिला पराभव ठरला.

पुणे संघाने सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला गोल करून सामन्यावर पकड घेतली. दरम्यान, यजमान संघाने अनेक वेळा बरोबरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पुण्याच्या गोलरक्षकाने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. दरम्यान, दुस-या हाफमध्ये कात्सो उरानिसने गोल करून पुणे एफसी संघाच्या आघाडीला २-० ने मजबूत केले होते. त्यानंतर कोलोम्बाने गोल करून पुणे संघाचा लढतीत शानदार विजय निश्चित केला.

चेन्नई-युनायटेड आज लढत
आयएसएलमध्ये शनिवारी चेन्नईयन एफसी व नॉर्थ ईस्ट युनायटेड यांच्यात लढत होईल.यजमान चेन्नईयन विजयी चौकारासाठी सज्ज झाला आहे. या संघाने तीन विजयासह गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे.