चेन्नई - यजमान चेन्नईयन एफसी संघ आणि सौरव गांगुलीचा अॅथलेटिको डी कोलकाता यांच्यात मंगळवारी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत काट्याची लढत होईल. दोन्ही संघ लीगमध्ये विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.
टीम इंडियाचा महेंद्रसिंग धोनी, सिनेअभिनेता
अभिषेक बच्चनच्या चेन्नईयन संघाचा घरच्या मैदानावर सामना
आपल्या नावे करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे कोलकाता संघ विजयासह आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील. कोलकाता संघ ११ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ अवघ्या दोन गुणांनी पिछाडीवर असलेला चेन्नईयन दुस-या स्थानावर आहे.
मार्को विजयासाठी उत्सुक
कर्णधार व संघ व्यवस्थापकाच्या दुहेरी भूमिकेत असलेला मार्को मात्तेराजी हा घरच्या मैदानावर चेन्नईयन एफसीला विजय मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईयनने चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवले आहेत.
कोलकाता फॉर्मात
कर्णधार लुईस गार्सियाच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघ सध्या आयएसएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. या संघाने पाचपैकी तीन सामन्यांत बाजी मारून अव्वल स्थान गाठले. सध्या या संघाचा हुकमी एक्का फिकरू तेफेरा बाहेर आहे. मात्र, तरीही दादाच्या कोलकाता संघाने विजयी मोहीम कायम ठेवत लीगमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.