आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे अनफिट असलेले खेळाडू आयपीएलसाठी ‘फिट’?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदाच्या ‘आयपीएल’साठी नऊ संघांची बुधवारी घोषणा झाली. नऊ संघांमध्ये भारताच्या काही जायबंदी खेळाडूंची नावेही आहेत. फिटनेसच्या कारणास्तव भारतीय संघाबाहेर बसलेल्या खेळाडूंना आपल्या मालकांचा आग्रह मात्र टाळता येत नाही, असे यावरून दिसते.

यापूर्वीच्या आयपीएलमध्ये वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, जहीर खान, इरफान पठाण, मुनाफ पटेल या खेळाडूंनी आपापल्या संघासाठी दुखापती बाजूला ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2013च्या आयपीएल स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये सध्या भारतीय संघाबाहेर बसलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय वेगवान गोलंदाजीचा आधारस्तंभ असलेला जहीर खान मुंबईच्या वतीने रणजी सामन्यात खेळत असताना जायबंदी झाला. त्याने त्यानंतर बंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये जाऊन आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील डॉक्टरांनी त्याला पूर्ण फिट झाला नसल्याचे कळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत खेळण्याऐवजी त्याने तंदुरुस्ती वाढवून पूर्णपणे फिट होण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, एप्रिल महिन्यात सुरू होणार्‍या आयपीएल स्पर्धेसाठी तो तंदुरुस्त असेल का? पूर्णपणे फिट नसल्यास भारतीय संघाला जसे आपली असमर्थता कळवण्याचे स्वातंत्र्य त्याला होते, तसे स्वातंत्र्य त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स देईल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्ससाठी पूर्णपणे फिट नसतानाही जहीर खान गोलंदाजी करणार का?

इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथील पहिल्याच कसोटीत जायबंदी झालेला उमेश यादव याच्या फिटनेसबाबतही सर्वजण अंधारात आहेत. मात्र, दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी त्याला खेळावे लागेल. उमेश यादव सध्या बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये गोलंदाजीचा सराव करीत आहे. तेथे तो फिटनेसवरही लक्ष देत आहे. वरुण अरुण हादेखील भारतीय संघात येऊन फिटनेसमुळे बाहेर गेलेला खेळाडू आयपीएल संघात आहे. जहीर खानच्या पोटरीला दुखापत झाली होती तर यादवला पाठदुखीचा त्रास जाणवत होता. या दोघांनीही आपण तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, असे कळते. इरफान पठाण, मुनाफ पटेल यांनादेखील आयपीएल स्पर्धेत खेळण्यात रस आहे.

दुखापती घेऊन आयपीएल स्पर्धेत खेळल्यामुळे यापूर्वी देखील भारतीय संघाला आपल्या काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती जाणवली होती. या वेळी आयपीएलनंतर इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे.