जालंधर - भारतीय महिला कबड्डी संघाने गुरुवारी विश्वचषक पटकावला. यजमान महिला टीमने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली. भारतीय महिला संघाने 49-21 अशा फरकाने सामना जिंकून विश्वचषकावर नाव कोरले.
वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या भारतीय महिला संघाला एक कोटींचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तिस-यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम भारतीय महिलांनी केला आहे.
कर्णधार सुखविंदर कौर सुक्खीच्या नेतृत्वाखाली महिला संघाने शानदार कामगिरी केली. भारताकडून प्रियंका आणि खुशबूने उत्कृष्ट चढाई केली. त्यामुळे संघाला मध्यंतरांपूर्वीच मोठी आघाडी घेता आली. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये 16-9 अशा फरकाने आघाडी घेतली. ही लय कायम ठेवताना भारताने दुस-या क्वार्टरमध्ये 22-11 आणि तिस-या क्वार्टरमध्ये 35-11 ने मजबूत आघाडी नोंदवली. प्रियंका आणि खुशबू या दोघींच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महिला संघाने सामन्यात शानदार विजय मिळवला. पाहुण्या न्यूझीलंडकडून कॅफरिना आणि जसमीनने चांगली कामगिरी केली. मात्र, त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
अनुराणी, राम बटेरीला कार
विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सर्वोत्तम खेळ करणा-या भारतीय संघाच्या अनुराणी आणि राम बटेरीला मारुती कार देऊन सन्मानित करण्यात आले. राम बटेरी ही स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू ठरली. तिला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.