आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indiana Wells Masters Tennis Competition News In Marathi

मास्टर्स टेनिस स्पर्धा: राफेल नदाल, शारापोवा पराभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाना वेल्स- जगातील नंबर वन राफेल नदालला मंगळवारी इंडियाना वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. त्याला युक्रेनच्या अलेक्झांद्र डोग्लोपोलोवने पराभूत केले. युक्रेनच्या खेळाडूने लढतीत 6-3, 3-6, 7-6 ने विजय मिळवला.

दुसरीकडे महिला गटात रशियाची मारिया शारापोवा आणि सर्बियाची अँना इव्हानोविकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. डोग्लोपोलोवने बलाढय़ नदालविरुद्ध दमदार सुरुवात केली. यासह त्याने पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारून आघाडी मिळवली. मात्र, दमदार पुनरागमन करताना नदालने लढतीत बरोबरी साधली. त्याने दुसरा सेट आपल्या नावे केला. त्यानंतर तिसर्‍या निर्णायक सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी विजयासाठी झुंज दिली. अखेर ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेला हा सेट युक्रेनच्या खेळाडूने जिंकून जगातील नंबर वन टेनिसपटूला बाहेरचा रस्ता दाखवला. नदालने 2007, 2009 आणि 2013 मध्ये या स्पर्धेचा किताब पटकावला होता.
अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सने सर्बियाच्या अँना इव्हानोविकला पराभूत केले. तिने 7-6, 6-4 ने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपनची उपविजेती डोमिनिका सिबुलकोवाने रशियाच्या एकतारिना माकारोवावर 6-4, 7-5 ने मात केली. पेत्रा क्वितोव्हाने रशियाच्या कुज्नेत्सोवाला 6-3, 2-6, 6-0 ने हरवले. इटलीच्या कॅमिला गिओर्गिने मारिया शारापोवाविरुद्ध सनसनाटी विजय मिळवला. तिने 6-3, 4-6, 7-5 ने शारापोवाला धूळ चारली.

पेस-स्तेपानेक उपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या लिएंडर पेसने मंगळवारी रादेक स्तेपानेकसोबत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या चौथ्या मानांकित जोडीने जोनाथन एर्लिच आणि रिचर्ड गास्केटचा 6-3, 7-5 ने पराभव केला. यासाठी या जोडीला 66 मिनिटे झुंज द्यावी लागली. आता या जोडीचा सामना स्वीसच्या रॉजर फेडरर आणि स्टॅनलिस वांवरिकाशी होईल.