दुबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेड येथे नुकत्याच झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत
टीम इंडियाचा पराभव झाला. मात्र, भारतीय खेळाडूंनी सामन्यात दमदार प्रदर्शन केल्याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीयांची प्रगती झाली आहे. अॅडिलेड कसोटीच्या दोन्ही डावांत शतके ठोकण्याचा पराक्रम करणारा टीम इंडियाचा प्रभारी कर्णधार
विराट कोहलीने टॉप-२० मध्ये प्रवेश केला आहे. कोहली आता १६ व्या क्रमांकावर आहे.
कोहलीच्या दोन शतकांनंतरही भारताचा ४८ धावांनी निसटता पराभव झाला. मात्र, कोहलीने क्रमवारीत प्रगती साधली आहे. फलंदाजांच्या यादीत कोहली भारतीयांकडून सर्वांत पुढे १६ व्या क्रमांकावर आहे. भारताचा युवा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या नावे ७०३ तर पुजाराच्या नावे ६८९ गुण आहेत. दोन शतकांनंतर कोहलीला तब्बल ८५ रेटिंग गुणांचा फायदा झाला. अॅडिलेड कसोटीपूर्वी कोहली २७ व्या क्रमांकावर होता. आफ्रिकेचा मधल्या फळीचा फलंदाज फॉप डुप्लेसिसच्या तुलनेत कोहली अवघ्या ४ रेटिंग गुणांनी मागे आहे, तर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमच्या तुलनेत कोहली १४ गुणांनी मागे आहे. डुप्लेसिस १५ व्या तर मॅक्लुम १४ व्या क्रमांकावर आहे. या मालिकेत शानदार प्रदर्शन करून या दोघांना क्रमवारीत मागे टाकण्याची कोहलीकडे चांगली संधी असेल.
मुरली विजय ६१० गुणांसह २९ व्या क्रमांंकावर तर महेंद्रसिंग धोनी ६०१ गुणांसह ३१ व्या क्रमांकावर आहे. अजिंक्य रहाणे ४२ व्या तर रोहित शर्मा ५२ व्या स्थानी आहेत.
कांगारूंचीही आघाडी
क्रमवारीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आघाडी घेतली आहे. अॅडिलेड कसोटीत १४५ आणि १०२ धावा अशी सलग दोन शतके ठोकणारा वॉर्नर फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी प्रगती करताना चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही त्याची कारकीर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. अॅडिलेड कसोटीत १६२ आणि ५२ धावांची खेळी करणा-या स्टीव्हन स्मिथने टॉप-१० मध्ये प्रवेश करताना ५ स्थानांच्या प्रगतीसह आठवे स्थान पटकावले आहे. मायकेल क्लार्क १२ व्या स्थानी आहे.
अश्विनची आघाडी
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताकडून ऑफस्पिनर आर. अश्विन सर्वाधिक ७०३ रेटिंग गुण घेऊन १३ व्या क्रमांकावर आहे. डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझा १४ व्या स्थानी आहे. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा टॉप-२० मधून बाहेर झाला असून तो आता २१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्टेन नंबर वन आहे.
टॉप-१० मध्ये एकही भारतीय नाही
फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-१० मध्ये एकही भारतीय नाही. फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा नंबर वन आहे, तर आफ्रिकेचा एल्बी डिव्हिलर्स दुस-या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या टॉप-१० मध्येसुद्धा भारताचा एकही खेळाडू नाही. गोलंदाजांच्या यादीत आफ्रिकेचा डेल स्टेन नंबर वन असून श्रीलंकेचा रंगना हेराथ दुस-या क्रमांकावर आहे.