आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय युवा क्रिकेट संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - फायनलमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळवत भारतीय युवा क्रिकेट संघाने (23 वर्षांखालील) आशिया क्रिकेट कौन्सिल इमर्जिंग ट्रॉफी जिंकली. रविवारी झालेल्या फायनलमध्ये पाकने प्रथम फलंदाजी करताना 47 षटकांत सर्वबाद 159 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 33.4 षटकांत अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य गाठून शानदार विजय साजरा केला. भारताच्या विजयात लोकेश राहुल (93) आणि मनप्रीत जुनेजा (51) यांनी अर्धशतके ठोकली.


क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणा-या भारत-पाकिस्तान यांच्यात ज्युनियर पातळीवरील हा फायनलचा सामना एकतर्फी झाला. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. नंतर भारतीय फलंदाजांनी पाकची गोलंदाजी फोडून काढताना सहज विजयश्री मिळवली. लोकेश राहुलचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. तो 93 धावांवर नाबाद राहिला. राहुलने 107 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने या धावा काढल्या. तिस-या क्रमांकावर आलेल्या जुनेजाने 77 चेंडूंत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा काढल्या. राहुल आणि जुनेजा यांनी दुस-या विकेटसाठी अभेद्य 132 धावांची भागीदारी करून भारताचा विजय साजरा केला. धावांचा पाठलाग करताना सलामीवीर उन्मुक्त चंद अवघ्या 15 धावांवर बाद झाला. उन्मुक्तला रजा हसनने यष्टिरक्षक मोहंमद रिजवानकरवी झेलबाद केले. उन्मुक्त बाद झाला त्या वेळी भारताचा स्कोअर 1 बाद 28 धावा असा होता.


बाबा अपराजितच्या 3 विकेट
तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांच्या टिच्चून मा-यापुढे पाकला मोठी धावसंख्या रचता आली नाही. पाकिस्तानकडून तिस-या क्रमांकावर आलेल्या उमर वहीदने सर्वाधिक 41 धावा काढल्या. त्याच्यासह मोहंमद रिजवान (21), उस्मान शल्लाहुद्दीन (15), उस्मान कादीर (33) आणि एहसान आदिल (20) यांनी झुंज दिली. इतर फलंदाजांना दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. भारताकडून गोलंदाजीत बाबा अपराजितने 28 धावांत सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. संदीप शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी दोघांना बाद केले. औरंगाबादच्या अंकित बावणेने 3 षटके गोलंदाजी करताना 3 धावांत एक विकेट घेतली.


अंकितला फलंदाजीची संधी नाही
धावांचा पाठलाग करताना भारताने एकच विकेट गमावली. यामुळे मधल्या फळीत अंकित बावणेला फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. गोलंदाजीत अंकितने 3 षटकांत 3 धावा देताना एक विकेट घेतली. याशिवाय क्षेत्ररक्षणातही चुणूक दाखवताना त्याने उमर वहीदला धावबाद केले. स्पर्धेत अंकितने भारतीय संघाकडून आपल्या अष्टपैलुत्वाची चुणूक दाखवताना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगले प्रदर्शन केले.


संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : 47 षटकांत सर्वबाद 159. (उमर वहिद 41, 3/28 बाबा अपराजित, 2/20 सूर्यकुमार यादव), भारत : 33.4 षटकांत 1 बाद 160. (लोकेश राहुल नाबाद 93, एम. जुनेजा नाबाद 51, 1/41 रजा हसन).