औरंगाबाद- वेगवान खेळ आणि अचूक बास्केट करणारा संघ अजिंक्य ठरतो. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित १८ व्या राज्य क्रीडा महोत्सवात पुणे, मुंबई, नागपूरचे संघ खेळणार आहेत. अनेक वर्षांपासून या खेळात या संघांनी महिला व पुरुष गटात वर्चस्व राखले आहे. त्यांची मक्तेदारी कोणीही मोडू शकले नाही. यंदा त्याच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी अमरावती, यजमान संघ, कोल्हापूरने कंबर कसली आहे. गतवर्षीसह तीन वेळा औरंगाबादच्या मुलींनी तिसरा क्रमांक पटकावला असून यंदा सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवून संघाने कठोर परिश्रम घेतले. अमरावतीने कसून तयारी केली आहे. स्पर्धेसाठी दोन कोर्ट तयार असून एका कोर्टवर नवीन हायड्रोलिक स्टँड लावण्यात आले आहे.
०४ दिवस शिल्लक
३८४ एकूण खेळाडू
३२ एकूण संघ
१८० महिला खेळाडू
२०४ पुरुष खेळाडू
विद्या, मार्टिना, मयूरीवर मदार
यजमान संघाची मदार राष्ट्रीय खेळाडू विद्या केदारेसह अनुभवी मार्टिना झेड, मयूरी बोर्डे, श्वेता मोहन यांच्यावर राहणार आहे. अचूक बास्केट, मोक्याच्या क्षणी संघाला आघाडी मिळवून देण्यात तरबेज असलेल्या विद्यावर संघाची भिस्त आहे. गेम मेकर असलेल्या मॉर्टिनाचा सहकाऱ्यांशी चांगला ताळमेळ जुळतो. ड्रायव्हर टेकर असलेल्या मयूरी थ्री पॉइंटर घेण्यात तज्ज्ञ आहे. पहिल्या दोनमध्ये येण्याची संघाची तयारी झाली आहे.
सलामीलाच बलाढ्य कोल्हापूरचे आव्हान
पहिल्यांदा पदकाच्या शर्यतीत आलेल्या यजमान मुलांच्या संघासमोर गटात सलामीच्या लढतीत कोल्हापूरने तगडे आव्हान ठेवले आहे. वेगवान व चपळ खेळ करणारे प्रशांत बुंदेले, प्रगत बकाल, सौरभ डिलटे, महेश इंगळे, सचिन परदेशी यांना विद्यापीठासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची यंदा संधी मिळाली आहे. तंदुरुस्ती आणि दीर्घ सरावाच्या बळावर संघ आर्श्चकारक कामगिरी करण्यास सज्ज झाला.