आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव: यजमानांना नाशिक, अमरावतीचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून व्हॉलीबॉल स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, अमरावतीच्या स्मॅशला यजमान विद्यापीठ ब्लॉक सज्ज झाला आहे. स्पर्धेत अमरावती, पुणे, नांदेड आणि नाशिकचे संघ धक्कादायक निकाल नोंद करण्यात तरबेज आहेत. त्यांना कमी लेखून चालत नाही. आतापर्यंत प्रत्येक वेळी या संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. गतवर्षी यजमान संघाने चौथा क्रमांक पटकावला होता. यंदा घरच्या मैदानावर कसून सराव करत असलेल्या यजमान संघाला चमकदार कामगिरी करण्याची आशा आहे. स्पर्धेसाठी एकूण चार कोर्ट तयार करण्यात आले असून दोन कोर्टवर फ्लड लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई बेस्ट; नांदेड जायंट किलर
स्पर्धेत मुंबईचे संघ सर्वात बलाढ्य आहेत. त्यांच्या संघात दरवर्षीवर दक्षिण राज्यातील अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असतो. शिक्षणासाठी मुंबईत आलेले नवीन खेळाडू त्यांच्या संघात असतात. त्याचा फायदा त्यांना होतो. त्याचप्रमाणे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा संघ जायंट किलर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या संघातही राष्ट्रीय खेळाडू असून लातूरचे खेळाडू उत्कृष्ट आहेत.
हेमंत, साजेदवर यजमानांची मदार
यजमान संघाची हेमंत निस्ताने, साजेद तांबोळी या राष्ट्रीय खेळाडूंवर सर्वाधिक मदार आहे. हे दोन्ही खेळाडू लयीत आले की कोणत्याही संघाला रोखण्यात तरबेज आहेत. हेमंत आणि साजेद सेंटर ब्लॉकर असून या दोघांचा बचाव भेदणे अशक्य आहे. त्यांना संघाची भिंत म्हणून ओळखले जाते. सेमीफायनलमध्ये ड गटातून येण्याची शक्यता असलेल्या मुंबई किंवा नांदेड संघाला समोर ठेवून यजमान संघ तयारी करत अाहे.
मुलींमध्ये पुण्याला प्रथम पसंती
मुलींच्या गटात पुण्याच्या संघाला प्रथम पसंती आहे. त्यानंतर कोल्हापूर, मुंबईच्या संघाचा नंबर लागतो. अमरावतीलाही चांगली संधी आहे. यजमान संघाला गटातच मोठा संघर्ष करावा लागणार आहे. स्पर्धेत यजमान संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकतो. संघात राष्ट्रीय खेळाडू तनुजा शिंदे, साबिया पठाण, रूपाली राठोड, सोनाली खोतकर यांचा समावेश आहे. चपळ, अचूक पास आणि वेगवान खेळ करण्यात या चौघी माहिर आहेत.
०६ दिवस शिल्लक
४०८ एकूण खेळाडू
३४ एकूण संघ
२०४ महिला खेळाडू
२०४ पुरुष खेळाडू