नवी दिल्ली - ग्रँडस्लॅम पुरस्कारांचा बादशहा रॉजर फेडररने
आपला दबदबा कायम ठेवत इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगमध्ये (आयपीटील) सलग तिस-या विजयाची नोंद केली. फेडररचा प्रतिस्पर्धी आणि जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक योकोविकचा (सर्बिया) भारतभूमीवर पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. फेडररचा हा दुसरा भारत दौरा आहे. परंतु तो पहिल्यांदाच भारतभूमीवर प्रत्यक्षात सामने खेळतोय.
रविवारी त्याने मिश्र दुहेरीत
सानिया मिर्झासोबत आणि पुरुष दुहेरीत
रोहन बोपन्नासोबत तसेच एकेरी सामन्यातही विजय नोंदवला. योकोविक यूएई रॉयल्स संघाकडून खेळत आहे. पुरुष दुहेरीत नेनाद जिमोनजिचसोबत खेळताना विल्फ्रेड सोंगा आणि डॅनियल नेस्टरच्या जोडीने पराभूत केले. योकोविकच्या संघाचा या सामन्यात २४-२७ ने पराभव झाला. या स्पर्धेच्या सुरुवातीला मनिलाच्या मार्क फिलिपोसिसने यूएई रॉयल्सच्या गोरान इवानिसेविचला ६-३ ने पराभूत केले. पुरुष एकेरीत यूएस ओपनचा विजेता मारिन सिलिचने मनिलाच्या सोंगाला टायब्रेकरमध्ये ६-५ ने पराभूत केले.