आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल-6 साठी बीसीसीआयची स्पोर्टिंग खेळपट्ट्यांची सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - ‘आयपीएल सहा’मध्ये कोणत्याही फ्रॅँचायझीच्या दबावाला बळी न पडता, त्यांच्या आग्रहानुसार खेळपट्ट्या तयार करू नयेत, असे स्पष्ट आदेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्व संबंधित क्युरेटर्सना दिले आहेत.
आज चेन्नईमध्ये बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी आणि विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनांचे ग्राउंड क्युरेटर्स यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बोर्डाचे सचिव संजय जगदाळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये आयपीएल सामने ज्या केंद्रांवर होणार आहेत, त्या केंद्राच्या क्युरेटर्सना ‘स्पोर्टिंग विकेट’ तयार करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले.

कोणत्याही फॅँचायझींच्या कप्तान, खेळाडू, संघव्यवस्थापन अथवा मालकांच्या आदेशानुसार खेळपट्टी तयार करू नये, असे या बैठकीत बजावण्यात आले आहे. खेळपट्टीसंदर्भात क्युरेटर किंवा फ्रॅँचायझी यांनी प्रसिद्धीमाध्यमांना कोणतीही माहिती देऊ नये, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

आचारसंहितेसाठी एमसीएची बीसीसीआयला विनंती
आयपीएल स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये खेळाडूंशिवाय अन्य व्यक्तींच्या प्रवेश, वर्तणूक आणि पात्रता यासंबंधी आचारसंहिता निश्चित करण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला विनंती केली आहे. खेळाडूंसाठी राखीव असणारी ही जागा ‘डग आऊट’ आणि सामना संपल्यानंतर मैदानावर कुणाकुणाला प्रवेश करता येईल, अशा व्यक्तींची एक यादीच तयार करण्याचा बीसीसीआय विचार करत आहे.