आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरे फिक्सिंग तर हेच; तपास पूर्ण होईपर्यंत दालमिया काम पाहणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीची रविवारी दुपारी चेन्नईत बैठक झाली. एन. श्रीनिवासन बोर्डाच्या अध्यक्षपदी कायम राहतील; परंतु प्रत्यक्ष कामकाज पाहणार नाहीत. फिक्सिंग प्रकरणाचा तपास होईपर्यंत त्यांचे काम जगमोहन दालमिया पाहतील, असा निर्णय बैठकीत झाला. दर आठवड्याला वर्किंग कमिटी दालमियांच्या निर्णयाचा आढावा घेईल, असेही ठरले. बैठकीत जे काही घडले ते वाचा जशास तसे.
> बैठकीत सुरुवातीलाच जेटली यांनी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) श्रीनिवासन यांना सांगितले की, तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही बोर्डाच्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहा.
> श्रीनिवासन राजी झाले. त्यानंतर जगदाळे आणि शिर्के यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले.
> बिंद्रा यांनी बैठकीच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केला. वर्किंग कमिटीच्या पुढील बैठकीत त्याची पुष्टी केली जाऊ शकेल, असे राजीव शुक्ला यांनी म्हटले.
> सदस्यांनी जेटली यांना हंगामी अध्यक्ष होण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी नकार दिला.
> जेटली यांनी शशांक मनोहर आणि दालमिया यांच्या नावांचा प्रस्ताव मांडला.
> श्रीनिवासन यांना सांगितले की, क्लीन चीट मिळाल्यानंतर ते कार्यभार सांभाळू शकतील. उर्वरित. पान 2
> मनोहर यांच्या नावावर मतैक्य झाले नाही. जेटली आणि अनुराग ठाकूर यांनी दालमिया यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
> सर्वांची सहमती झाली की, श्रीनिवासन कामकाजापासून दूर राहतील. राजीनामा देणार नाहीत, कारण कोणी मागणीच केली नाही.
> दालमिया यांनी हंगामी व्यवस्थेचे प्रमुख होण्यावर सहमती दर्शवली.
> कोणतेही पद नसताना दालमिया दैनंदिन निर्णय कसे घेणार, असा सवाल बिंद्रा यांनी केला. त्यावर शुक्ला म्हणाले की, दालमिया आणि त्यांची टीम दर पंधरवड्याला निर्णयांवर वर्किंग कमिटीकडून मंजुरी घेईल. सदस्यांनी सहमती दर्शवली.
> त्यानंतर वर्किंग कमिटीने चौकशी समितीत जगदाळे यांच्या जागी तिसर्‍या सदस्याची नियुक्ती करण्याचे अधिकार दालमिया यांना दिले.
> गुरुनाथ मयप्पन यांच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती कोणी नेमली, असा सवाल बिंद्रा यांनी केला.
> आयपीएल सेक्रेट्रिएटने तसे आदेश दिले आहेत, असे प्रो. रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. सेक्रेट्रिएटमध्ये सीईओ सुंदररमन आणि पीटर ग्रिफिथ यांचा समावेश आहे.
> आयसीसीच्या अँटी करप्शन आणि सिक्युरिटी युनिटने गुरुनाथबाबत बीसीसीआयला सावध केले होते काय, असा सवाल बिंद्रा यांनी केला.
> बीसीसीआयच्या कोणाही पदाधिकार्‍याशी याबाबत संपर्क साधला गेला नाही, असे सांगण्यात आले.
> अनुराग ठाकूर यांनी प्रेस नोट तयार करताच बैठक संपली. श्रीनिवासन राजीनामा देणार नाहीत. दैनंदिन कामकाजापासून दूर राहतील, असे त्यात स्पष्ट करण्यात आले.

केव्हा, का, कसे झाले हे फिक्सिंग

दालमिया काय करतील?
श्रीनिवासन यांचे हित ते कायम जोपासतील. दोघेही अनेक वर्षांपासूनचे मित्र. एकेकाळी जे शुक्ला व जेटली दालमियांना भ्रष्ट ठरवत होते त्यांनीच आता क्रिकेटच्या हितासाठी दालमियांना पुढे केले.

श्रीनि काय करतील?
दालमियांमार्फत निर्णय घेतील. पुढे आयसीसीचा अध्यक्ष होण्यासाठी नवे प्यादे तयार करतील.

जेटली-शुक्लांनीही केले फिक्सिंग!
अरुण जेटली व राजीव शुक्ला ज्या दिवशी भेटले त्याच दिवशी फिक्सिंग झाली होती. त्याच दिवशी शुक्ला म्हणाले की, तपास होईपर्यंत श्रीनिवासन यांनी जबाबदारीतून मुक्त व्हायला हवे. या दोघांनीही राजीनाम्याचा ‘र’ पण उच्चारला नाही.

एवढा गदारोळ कशासाठी?
ते सगळे खोटे होते. ती आक्रमक विधाने, ते राजीनामे सब झूठ. जो काही टेम्पो तयार झाला होता त्याच्या माध्यमातून शुक्ला आणि जेटली यांनी संगनमताने शरद पवारांना मात दिली आहे. त्यांच्या बाजूने अनुराग ठाकूर (धुमल यांचे पुत्र आणि हिमाचल क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष) भडकाऊ विधाने करत होते. खरे तर काही राजीनाम्यांच्या आधारावरून अंदाज बांधण्यात येत होता की, श्रीनिवासन एकाकी पडले आहेत, परंतु ते सगळे खोटे होते. वास्तवात शरद पवार गटाला एकाकी करण्यात आले आहे.... आणि हेच घडवण्यासाठी श्रीनिवासन, दालमिया, जेटली आणि शुक्लांची एकजूट झाली आहे.

तपासाचे काय होणार?
कोणी त्यावर बोलतच नाही.
जगदाळे यांच्या जागी कोण येणार यावर वर्किंग कमिटीत चर्चाही झाली नाही. श्रीनिवासन जसे सांगतील तसेच आणि त्याच दिशेने सगळे कामकाज करण्याचा दालमियांचा प्रयत्न राहील.

पुढचा सचिव कोण?
संजय जगदाळे यांच्या मते -
अनुराग ठाकूर किंवा अनिल कुंबळे यांच्यापैकी कोणीही एक.

खरे कोण? बिंद्रा की श्रीनिवासन
मी एकट्यानेच श्रीनिवासन यांचा राजीनामा मागितला, असे पंजाब क्रिकेट संघाचे अध्यक्ष आय.एस. बिंद्रा यांनी म्हटले. श्रीनिवासन यांनी मात्र त्यांचे म्हणणे फेटाळले. राजीनामा शब्दही उच्चारला गेला नाही, असे इतर दोन सदस्य म्हणाले.

ललित मोदींनी केले ट्विट
बोर्डात घडले ते एखाद्या चित्रपटाला साजेसेच
चित्रपट- ‘द फिक्सर’
हीरो- गुरुनाथ मयप्पन
व्हिलन- एन. श्रीनिवासन
डायरेक्टर- अरुण जेटली
प्रोड्युसर- राजीव शुक्ला
स्क्रिप्ट- अनुराग ठाकूर

जगदाळे, शिर्के यांचे काय होणार?
दोघेही परत येणार नाहीत. अन्यथा येऊ दिले जाणार नाहीत. बैठकीनंतर जगदाळे आणि शिर्के यांना परतण्याचे आवाहन करण्यात आले, तो केवळ एक देखावा होता. दोघांनाही पवार गटाचे मानले जाते. श्रीनिवासन यांच्या जावयाविरोधात चौकशी करणार्‍या समितीत जगदाळेही होते. ते पारदर्शी तपासावर ठाम असतील आणि त्यांना दूर ठेवणे हादेखील जेटली-शुक्ला यांच्यातील कथित फिक्सिंगचाच भाग असू शकतो.

जेटलींच्या भूमिकेमागे राजकारण कोणते?
वास्तविक जेटली यांना यानंतर अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी ईस्ट व साऊथ झोनची मदत हवी आहे. श्रीनिवासन आणि दालमियाच ही मदत करू शकतात. बैठकीत म्हणूनच दालमियांच्या नावाचा प्रस्ताव जेटलींनी मांडला. ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे येथे असेच झाले. दालमिया शरद पवार यांचे शत्रू मानले जातात. जेटली-शुक्लांनी नेमका याचा फायदा उचलून मराठा लॉबीला वेगळे पाडले.

आयसीसीचे नेतृत्व?
स्थिती अस्पष्ट. अध्यक्ष आणि सचिवांना वाटेल तोच आयसीसीत प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे श्रीनिवासन स्वत:च प्रतिनिधित्व करतील हे स्पष्ट आहे. अशी अटही त्यांनी ठेवलेली होती.

मग अखेर झाले काय?
काहीच नाही. श्रीनिवासन कायम. काही दिवसांत लोक विसरतील. आयसीसी अध्यक्षपदासाठी श्रीनिवासन प्याद्यांची फिल्डिंग लावतील.

नवी व्यवस्था घटनाबाह्य
अजय शिर्के म्हणाले, मी, बिंद्रा, शशांक मनोहर आणि लेले नव्या घटनाबाह्य व्यवस्थेशी सहमत नव्हतो. बिंद्रा म्हणाले, बैठकीत जेटलींचेच वर्चस्व राहिले.दालमियांच्या नियुक्तीसह सर्व सूचना त्यांनीच केल्या.