कोलकाता- यजमान कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल-7 मध्ये गुरुवारी घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूचा 30 धावांनी पराभव केला. रॉबिन उथप्पा (नाबाद 83) आणि शाकीब-अल-हसन (60) यांच्या 121 धावांच्या भागीदारीच्या बळावर कोलकाताने सामना जिंकला. धारदार गोलंदाजी करून चार विकेट घेणार्या सुनील नरेननेही संघाच्या विजयात योगदान दिले. कोलकात्याने आठव्या विजयासह स्पर्धेच्या प्लेऑफमधील स्थान निश्चित केले.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सने 4 बाद 195 धावा काढल्या होत्या. सुनील नरेनने (4/20) धावांचा पाठलाग करणार्या बंगळुरूला 165 धावांत गुंडाळले. बंगळुरूकडून कर्णधार विराट कोहली 38, युवराजसिंग 22, सचिन राणा नाबाद 19 आणि स्टार्कने केलेली नाबाद 12 धावांची खेळी व्यर्थ ठरली.
बंगळुरूचे चॅलेंज संपुष्टात
कोलकाताविरुद्ध पराभवामुळे बंगळुरूचे प्लेऑफचे स्वप्न संपुष्टात आले. यापूर्वी पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्जने प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे.
रायडर्सचा आठवा प्रताप
संक्षिप्त धावफलक : कोलकाता : 4 / 195 (उथप्पा नाबाद 83, शाकीब 60, 1/32 स्टार्क) बंगळुरू : 5/165 (योगेश 45, कोहली 38, 4/20 नरेन)
उथप्पाची मॅक्सवेलवर सरशी
रॉबिन उथप्पाने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकले. त्याने यंदाच्या सत्रात सर्वाधिक धावांचा पल्ला गाठला. त्याच्या नावे आता 13 सामन्यांत 572 धावांची नोंद झाली. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या रॉबिन उथप्पाने गुरुवारी बंगळुरूविरुद्ध सामन्यात नाबाद 83 धावांची खेळी केली. त्याने 51 चेंडूंचा सामना करताना दहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 83 धावा काढल्या.
उथप्पा-शाकीबची शतकी भागीदारी
कोलकात्याच्या रॉबिन उथप्पा आणि शाकीबने बंगळुरूच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. यासह त्यांनी केकेआरला सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. यात शाकीबने 38 चेंडूंत तीन षटकारांसह 60 धावा काढल्या.
60 धावांचे शाकीब अल-हसनचे योगदान
83 धावांची रॉबिन उथप्पाची खेळी
04 विकेट सुनील नरेनने घेतल्या
बंगळुरूविरुद्ध भागीदारीचे शतक पूर्ण केल्यानंतर एकमेकांचे अभिनंदन करताना रॉबिन उथप्पा व शाकीब.