आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-7 : मुंबईचा रॉयल विजय, घरच्या मैदानावर सलग दुसरे यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गतविजेत्या मुंबई इंडियन्सने मंगळवारी रात्री आयपीएल-7 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 19 धावांनी शानदार विजय मिळवला. सामनावीर रोहित शर्माच्या (59) नाबाद अर्धशतकापाठोपाठ हरभजनसिंग (2/33), जसप्रीत बुमराह (2/22) व पवन सुयाल (2/35) यांनी केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 5 बाद 187 धावा काढल्या होत्या. प्र्रत्युत्तरात बंगळुरूला आठ गड्यांच्या मोबदल्यात 168 धावांपर्यंत मजल मारता आली. धावांचा पाठलाग करणार्‍या बंगळुरूकडून क्रिस गेलने 38, पार्थिव पटेलने 26 आणि विराट कोहलीने 35 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गौतम आणि बेन डंक यांनी डावाची सुरुवात केली. अशोक डिंडा आणि पटेल यांच्या मार्‍याला आत्मिविश्वासाने दोन्ही फलंदाज तोंड देत होते. दरम्यान, बेन डंक याने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात युवराजच्या हाती झेल दिला. त्यानंतर गौतम आणि अंबाती रायडूने गोलंदाजांवर हल्ला करून 46 धावांची भागीदारी केली. परंतु अशोक डिंडाने अंबाती रायडूचा त्रिफळा उडवला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरला. गौतम आणि रोहित शर्मा या दोघांची जोडी फार काळ टिकली नाही. यानंतर मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर कोरे अँडरसन मैदानात उतरला. त्याने यजुवेंद्र चहल या लेगस्पिनरच्या गोलंदाजीवर एक षटकार ठोकून झकास सुरुवात केली, परंतु संघाच्या 84 धावा झाल्या असताना कोहलीच्या हाती झेल देऊन तो बाद झाला. केरॉन पोलॉर्डचे मैदानात आगमन झाले. 14 षटकांनंतर युवीला गोलंदाजीसाठी आणण्यात आले. त्या वेळेस विराट कोहलीच्या हाती सामन्याची सूत्रे होती. परंतु रोहित शर्मा आणि केरॉन पोलॉर्ड या दोन अनुभवी खेळाडूंनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व 97 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने वरुण अ‍ॅरॉनच्या 19 व्या षटकात 24 धावा कुटल्या.
संक्षिप्त धावफलक :
मुंबई इंडियन्स : 5 बाद 187 धावा,
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : 8 बाद 168 धावा.
रोहितचे अर्धशतक
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाबाद 59 धावांची झंझावाती खेळी केली. त्याने 35 चेंडूंचा सामना करताना तीन चौकार आणि चार षटकारांसह अर्धशतक झळकावले. त्याचे हे यंदाच्या सत्रातील दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने 25 एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात 50 धावा काढल्या होत्या.
भज्जीकडून गेल झाला फेल
मुंबई इंडियन्सकडून हरभजनसिंगने चार षटकांत 33 धावा देत दोन गडी बाद केले. त्याने स्फोटक फलंदाज क्रिस गेलला बाद करून संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्यानंतर त्याने सलामीवीर पार्थिव पटेलला त्रिफळाचीत केले. जसप्रीत बुमराहने चार षटकांत 22 धावा देऊन दोन गडी बाद केले. मलिंगानेही 29 धावा देताना दोन विकेट मिळवल्या.
आजचे सामने
० दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स सामना दुपारी 4 वाजेपासून.
० चेन्नई सुपरकिंग्ज वि. किंग्ज इलेव्हन पंजाब लढत रात्री 8 वाजेपासून.