मुंबई - आयपीएल-7 मध्ये सुमार कामगिरी करत असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना बलाढ्य किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबईच्या संघाने या सत्रातील आतापर्यंतच्या पाचही लढतीत पराभव पत्करला आहे. तर, पंजाबने मात्र पाचही सामने जिंकून क्रमवारीत अव्वलस्थान पटकावलेले आहे. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ राजस्थान रॉयल्सशी दोन हात करण्यास सज्ज आहे.
दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर हा सामना होईल. मागच्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या संघाने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध सुपरओव्हरमध्ये विजय मिळवला होता. दिल्लीकडून केव्हिन पीटरसन, दिनेश कार्तिक यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे.
यांच्या कामगिरीकडे लक्ष
मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबदरम्यानच्या सामन्यात दोन्ही संघांचे ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहील. कारण आयपीएलच्या यापूर्वीच्या सत्रात तो मुंबई इंडियन्सच्या संघात होता तर या वेळी तो पंजाबचे प्रतिनिधित्व करताना तडाखेबाज खेळी साकारतोय. दिल्ली डेअरडेव्हिल्स राजस्थान रॉयल्सदरम्यानच्या सामन्यात शेन वॉटसन, केविन पीटरसन आणि स्मिथच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
सामन्यांची वेळ
०मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब- दुपारी 4 वाजेपासून
०राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स- रात्री 8 वाजेपासून