आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली, गंभीर, धवनला शतकाची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या शतकाची अजूनही प्रतीक्षा आहे. इतकेच नव्हेतर गौतम गंभीर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, त्याच्या नावे अजून एकही शतक नाही. विशेष म्हणजे धोनीला (70*) वगळता गंभीर (93), धवन (95*) आणि कोहली (99) यांचे 90 पेक्षा अधिक धावा काढल्यानंतरसुद्धा शतक हुकले. आता हे खेळाडू येत्या आयपीएल-7 मध्ये शतक ठोकून विशेष कामगिरी करतील, अशी चाहत्यांना आशा आहे.

गौतम गंभीरच्या नावे आयपीएलच्या मागच्या 6 सत्रात 88 सामन्यांत 2471 धावा आहेत. केकेआरने गंभीरच्या नेतृत्वाखालीच 2012 मध्ये विजेतेपद पटकावले होेते. सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल 2512 धावांसह नंबर वन आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 22 खेळाडूंनी एकूण 28 शतके ठोकली आहेत. यात गेलच्या नावे सर्वाधिक 4 शतके आहेत. त्याच्या नावे सर्वाधिक नाबाद 175* खेळी करण्याचा रेकॉर्डसुद्धा आहे. शतक ठोकण्याच्या यादीत भारतीय खेळाडू विदेशींच्या तुलनेत मागेच आहेत. भारताकडून 8 खेळाडूंनी तर विदेशातील 14 खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. यात ऑस्ट्रेलियन फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि डेव्हिड वॉर्नरच्या नावे प्रत्येकी 2 शतके आहेत. भारतीय खेळाडूंत चेन्नई सुपरकिंग्जचा मुरली विजय असा एकमेव खेळाडू आहे, ज्याच्या नावे दोन शतके आहेत. टी-20 चा स्टार खेळाडू आयपीएलमध्ये धावा काढण्याबाबत मागे आहे. त्याने 70 सामन्यांत 1475 धावा काढल्या आहेत.

गंभीरच्या नेतृत्वात विजेतेपद
केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरने 2012 मध्ये आपल्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. त्या वेळी त्याने 17 सामन्यांत 590 धावा ठोकल्या होत्या. मागच्या सत्रातसुद्धा त्याने 16 सामन्यांत 406 धावा काढल्या. यात 4 अर्धशतके झळकावली. प्रदीर्घ काळापासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या गंभीरने टी-20 मुश्ताक अली ट्रॉफीत दिल्लीकडून चांगला खेळ केला. हे यश तो आयपीएलमध्येही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

हैदराबादची धुरा शिखर धवनकडे
शिखर धवन यंदा सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असेल. त्याच्यावर संघाची मदार आहे. आयपीएल-6 मध्ये त्याने 311 धावा काढल्या होत्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात धवनची कामगिरी महत्त्वाची होती. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत 5 सामन्यांत 363 धावा काढल्या होत्या. याच आधारे त्याला विस्डेनने वर्षाच्या पाच सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंत सामील केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो अपयशी ठरत आहे.