आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8: LIVE Match Between Kings XI Punjab And Royal Challengers Bangalore

IPL: गेलच्या आयपीएलमध्ये ३ हजार धावा; स्टार्क व अरविंदचे प्रत्येकी चार बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - क्रिस गेलचे घणाघाती शतक (५७ चेंडूत ११७ धावा), डिव्हिलर्सची टोलेबाजी (२४ चेंडूंत ४७)आणि त्यानंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबचा तब्बल १३८ धावांनी खुर्दा उडवला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याची घोडचूक जॉर्ज बेलीला भोवली. गेलच्या भीमपराक्रमाने पंजाबला पळता भुई थोडी झाली. बंगळुरूच्या (३ बाद २२६) ‘विराट’ आव्हानासमोर त्यांनी १३.४ षटकांत ८८ धावांवरच गुडघे टेकवले.

पंजाबकडून वृद्धिमान साहाने १३ आणि अष्टपैलू अक्षर पटेलने २१ चेंडूत सर्वाधिक ४० धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. बंगळुरूकडून मिशेल स्टार्कने १५ धावांत ४ आणि अरविंदने २७ धावांत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
तत्पूर्वी पंजाबच्या संदीप शर्माच्या पहिल्या षटकात केवळ एक धाव निघाली. हा त्यांच्यासाठी क्षणभराचा आनंद ठरला. दुस-या षटकात मिशेल जॉन्सनचे गेलने २ षटकार व २ सणसणीत चौकारांसह २० धावा काढत स्वागत केले. जॉन्सनची टी-२० क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वाधिक धुलाई करण्यात आली. बंगळुरूने पॉवर प्लेच्या पहिल्या ६ षटकांत ६८ धावा काढल्या. चालू सत्रातील ही बंगळुरूची सर्वोच्च आणि इतर सत्रातील तिस-या क्रमांकाची धावसंख्या ठरली. गेलने २२ चेंडूंत ५० आणि ४६ चेंडूंत १०० धावा पूर्ण केल्या. त्याने कोहलीसोबत ११९ धावांची भागीदारी रचली. आयपीएल आठमधील गेलचे पहिले आणि एकूण पाचवे शतक ठरले. गेल आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू आहे. गेलचे टी-२० मध्ये एकूण १४ शतके आहेत. ब्रेंडन मॅक्लुम दुस-या स्थानावर असून त्याची एकूण ६ शतके आहेत. गेल अक्षर पटेलच्या फॉलो थ्रूद्वारे झेलबाद झाला.

या षटकारावर एकही धाव नाही
जबरदस्त फॉर्मात असलेल्या गेलने पाचव्या षटकात पाचव्या चेंडूवर शानदार षटकार खेचला. विशेष म्हणजे या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. चेंडू सीमारेषेपार करण्यापूर्वी स्पायडर कॅमला जाऊन लागला होता. याला सर्वात पहिले मॅक्सवेलने पाहिले. त्याने अंपायरला याची माहिती दिल्यावर चेंडूला डेड घोषित करण्यात आले.

ऑल इज गेल
११७ धावा
५७ चेंडू
०७ चौकार
१२ षटकार

१४ सर्वाधिक शतके लगावली आहेत गेलने टी-२० मध्ये, मॅक्लुम (६) दुस-या स्थानावर.
२० धावा काढल्या जॉन्सनच्या एका षटकावर, टी-२० मधील जॉन्सनचे सर्वात महागडे षटक ठरले.

२७, ५३ धावांवर जीवदान
कॅरेबियन स्टार खेळाडू गेलला नशिबानेदेखील साथ दिली. तो २७ धावांवर असताना पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने त्याचा झेल सोडला. गेल जेव्हा ५३ धावांवर होता त्या वेळी मनन व्होराने स्क्वेअर लेग बाउंड्रीवर बेलीसारखी चूक करत झेल सोडला. अखेर त्याच्या परिणामाला पंजाबला समाेरे जावे लागले.

पंजाबने वीरूला वगळले
किंग्ज इलेव्हनने बंगळुरूविरुद्ध लढतीत वीरेंद्र सेहवागला अापल्या अंतिम अकरा खेळाडूंत स्थान दिले नाही. त्याच्या जागी मनन व्होराला संघात संधी देण्यात आली. वीरूने गेल्या पाच लढतीत केवळ १६ धावा काढल्या. त्याने पाच लढतीत ११, १, १, १ आणि २ धावांची खेळी केली.