आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल बोलीत भारतीयांचा दबदबा; युवीसाठी माल्यांनी मोजले जास्तीचे 4 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- भारतीय वनडे क्रिकेट संघातून बाहेर असलेला दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि इंग्लंड संघाबाहेर करण्यात आलेल्या केविन पीटरसनला आयपीएल-7 च्या बोली प्रक्रियेत जबरदस्त मागणी मिळाली. युवराजसिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 कोटी रुपयांत तर दिनेश कार्तिकला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 12.50 कोटी रुपयांत आणि केविन पीटरसनला दिल्लीने 9.50 कोटींत खरेदी केले. बोली प्रक्रियेतील दुसरी फेरी गुरुवारी होणार आहे. बुधवारी 70 खेळाडूंना खरेदी करण्यात आले. गुरुवारी अनकॅप्ड खेळाडू आणि बुधवारी विक्री न झालेल्या 144 खेळाडूंवर बोली लागू शकते.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने सुपरकिंग्जच्या मुरली विजयला पाच कोटींत खरेदी केले. बोली प्रक्रियेत विक्री झालेला मुरली विजय पहिला भारतीय खेळाडू ठरला. या बोलीत महेला जयवर्धनेला एकाही संघाने खरेदी केले नाही. ऑस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 6.50 कोटींत तर डेव्हिड वॉर्नरला 5.5 कोटी रुपयांत सनरायझर्सने खरेदी केले. सेहवागला किंग्ज इलेव्हन पंजाबने 3.2 कोटींत खरेदी केले. नाइट रायडर्सने द. आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला 5.5 कोटी रुपयांत आपल्या संघात सामील करून घेतले. बोली प्रक्रियेतील 514 खेळाडूंच्या यादीत (169 भारतीय, 50 विदेशी खेळाडू) 219 खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे, तर 292 (255 भारतीय, 37 नवे विदेशी खेळाडू) नवे खेळाडू आहेत.

यांना खरेदीदार मिळाले नाहीत
महेला जयवर्धने, प्रसना जयवर्धने, अँग्लो मॅथ्यूज, तिलकरत्ने दिलशान, अजंता मेंडिस, डी. परेरा, उपूर थरंगा, प्रवीणकुमार, पंकजसिंग, मो. कैफ, वसीम जाफर, व्ही.आर.व्ही.सिंग, सुदीप त्यागी, एस. बद्रीनाथ, नमन ओझा, मुरली कार्तिक, रोमेश पोवार, अभिनव मुकुंद, मनप्रीत गोनी, जोगिंदर शर्मा, आर. पी. सिंग, मुनाफ पटेल, मॅथ्यू वेड, डेव्हिड हसी, कॅमरून व्हाइट, टीम पेनी, डी. क्रिस्टियन, ब्रेड हॉग, फिल ह्युजेस, ब्रेट ली, आर. फर्ग्युसन, डग बोलिंगर, कमिन्स, फवाद अहेमद, एफ. एडवर्ड्स, सुलेमान बेन, आंद्रे फ्लेचर, सॅम्युअल्स आदी.

आज 62 कोटी रुपये व 434 खेळाडूंवर बोली
लिलावाच्या पहिल्याच दिवशी 70 खेळाडूंची विक्री झाली आणि संघांचे चित्रही स्पष्ट झाले. युवराज सिंगला आपल्याकडे खेचून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ड्रीम बँटिंग लाइनअप तयार केली आहे. जगातील नामवंत गोलंदाजांचा समावेश असल्यामुळे गोलंदाजीत सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइटरायडर्स, मुंबई इंडियन्सचा वरचष्मा दिसतोय. आज लिलावाचा दुसरा दिवस असल्याने फ्रँ चायझी संघ संतुलित करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करतील. परंतु उपलब्ध बजेटमध्ये कोणत्या खेळाडूला खरेदी करावे यासाठी सर्वच फ्रँचायझीचा कस लागणार आहे. एका संघाला किमान 60 कोटी रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. बुधवारी एकूण 212.35 कोटी रुपयांची बोली लागली. गुरुवारी किमान 62.15 कोटींपर्यंत बोली लागण्याची शक्यता आहे.

युवीसाठी 4 कोटी अधिक मोजले : माल्या
युवराजसाठी चार कोटी अधिक मोजावे लागल्याची तक्रार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक विजय माल्या यांनी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलकडे केली आहे. युवीसाठी 10 कोटींची बोली लावल्यानंतर लिलाव पार पाडणारे रिचर्ड मेडले यांनी बोली पूर्ण झाल्याचे संकेतही दिले होते. पण कोलकात्याने पुन्हा बोली लावल्याने हा तोटा झाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. खरेदीसाठी हातोडा वाजवल्यानंतर मेडले यांनी बोली प्रक्रिया मुद्दामहून चालू ठेवली, असे माल्यांचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, संघनिहाय क्रिकेटपटू आणि खरेदी मुल्य...