आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Betting: SC Set To Dismiss N Srinivasan, Appoint Sunil Gavaskar

आयपीएल फिक्सिंग प्रकरण : श्रीनिंची गच्छंती; सनीचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावरून एन. श्रीनिवासन यांची गच्छंती करून सर्वोच्च न्यायालयाने सुनील गावसकरांकडे नेतृत्व सोपवण्याच्या दिलेल्या निर्णयाचे माजी खेळाडूंकडून जोरदार स्वागत केले जात आहे. तसेच राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचे यंदाच्या आयपीएलमधील स्थान कायम ठेवल्याच्या निर्वाळ्याचेही सर्वोच स्तरातून स्वागत केले जात आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य आहे, अशी प्रतिक्रिया राजीव शुक्ला यांनी दिली.

क्रिकेटपटूकडील जबाबदारीने आनंद
देशाच्या क्रिकेटचा कारभार हाकण्यासाठी सर्वोच्च पदावर एक क्रिकेटपटू असावा हे पाहताना खूप बरे वाटते, अशी प्रतिक्रिया सुनील गावसकरांचे पहिले कसोटी कप्तान अजित वाडेकर यांनी दिली आहे. बीसीसीआयची सूत्रे सुनील गावसकरांसारख्या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूकडे सोपवल्यामुळे आपल्याला अतिशय आनंद झाल्याचे वाडेकर पुढे म्हणाले.

बोर्डाला गावसकरांचे सक्षम नेतृत्व मिळणार
स्वत: खेळाडू असल्यामुळे सुनील गावसकर हे समस्या जाणतात. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलवरही कामकाजाची त्यांना माहिती आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना अडचण येणार नाही, असे मत माजी कसोटीपटू व माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे.

‘त्या’ संघांना खेळू देण्याचा निर्णय आवडला
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व माजी निवड समिती सदस्य चंदू बोर्डे यांनीही गावसकरांच्या हंगामी नियुक्तीबाबत समाधान व्यक्त केले आहे. आयपीएलची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत असतानाच त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गावसकरांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. राजस्थान व चेन्नई या संघांना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंचे व संघांचे नुकसान होऊ नये म्हणून खेळण्यासाठी दिलेल्या परवानगीचा निर्णयही चांगला आहे, असेही ते म्हणाले.

आयपीएल सीईओ सुंदर रमणचे काय?
सुंदर रमण हे सध्या आयपीएलचे सीईओ आहेत. शिवाय ते इंडिया सिमेंट कंपनीतही कार्यरत आहेत. न्यायालयाने सुनील गावसकर यांना रमणबाबत निर्णय घेण्यास सांगितले आहे. यात काही अडचण आल्यास ते न्यायालयाची मदत घेऊ शकतात.

गावसकरांचा करार संपुष्टात येणार
सुनील गावसकरांनी स्टार क्रिकेटशी आयपीएलच्या समालोचनाचा करार केला आहे. आता न्यायालयाने हा करार संपुष्टात आणावा तसेच याची नुकसान भरपाई बीसीसीआयने करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.