आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षांची मला जाण : कार्तिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली डेअरडेव्हिल्सने दिनेश कार्तिकला तब्बल साडेबारा कोटी रुपयांना विकत घेतल्याने त्याच्याकडून संघाच्या खूप अपेक्षा आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना दिनेश कार्तिक या यष्टिरक्षक फलंदाजाने दिल्ली डेअरडेव्हिल्सला माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची मला जाण असल्याचे म्हटले आहे.
माझ्याकडून संघाला सामना जिंकून देणार्‍या खेळींची अपेक्षा आहे, हे मी जाणतो. जेव्हा एखादी कॉर्पोरेट कंपनी तुमच्यात इतकी मोठी गुंतवणूक करते त्या वेळी त्याचा दबाव येतोच. मात्र, केवळ पैसा हाच मुख्य विषय नसतो. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करायला हवी, असेही कार्तिकने नमूद केले.
कोणत्याही एका बाबीवर भर नाही : नुकत्याच झालेल्या आशिया चषकात धोनीच्या जागी संधी मिळाल्यानंतरही कार्तिकला यष्टीमागे तसेच फलंदाजीतही विशेष चमक दाखवता आली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मी त्या मालिकेचा विचार करीत नसून येत्या आयपीएलचा विचार करीत असल्याचे सांगितले. त्या वेळी काही संधी निसटल्या म्हणून कोणत्याही एका बाबीवर भर दिलेला नाही. मी माझा नियमित सराव करीत असून आयपीएल हा पूर्णपणे वेगळा फॉर्म्युला असल्याचेही त्याने नमूद केले.
दिल्लीचे सराव सत्र आजपासून
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या सराव सत्राला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यात संघाची समीकरणे जुळवून घेण्याला आता वेळ नाही. मात्र, कर्णधार केविन पीटरसनसह रॉस टेलर, क्विंटन डी कॉक, मुरली विजय, मोहंमद शमी हे अन्य स्टार क्रिकेटपटू संघात असून संघ सातव्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करेल, त्याचे भाकीत आताच करणे योग्य होणार नसल्याचेही त्याने सांगितले. चांगल्या खेळाडूंनी परिपूर्ण असलेला संघ आणि गॅरी कर्स्टन यांच्यासारखे प्रशिक्षक यामुळे संघाची बांधणी चांगली झाल्याचेही कार्तिक म्हणाला.