मुंबई - स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुदगल समितीच्या अहवालात ज्या ‘Individual No 2’ चा उल्लेख आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून कर्णधार धोनी आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मुख्य संशयीत गुरुनाथ मयप्पन
टीम इंडिया आणि आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार
महेंद्रसिंह धोनीच्या रुममध्ये नियमीत येत-जात होता. हा दावा इंग्रजी दैनिक 'डीएनए' ने केला आहे. मुदगल समितीचा अहवला पाच हजार पानांचा असून तो अजून सार्वजनिक झालेला नाही. जस्टिस मुदगल यांच्याकडून 29 पानांचा गोषवाराच फक्त संबंधीत लोकांना दिला गेला आहे. त्यात क्रिकेटर्सच्या नावांचा अनुक्रमे उल्लेख करण्यात आला आहे.
डीएनएच्या वृत्तानुसार, जस्टिस मुदगल यांनी नियुक्त केलेले तपासकर्ते बी.बी. मिश्रा यांनी चार महिने तापस करुन तयार केलेल्या अहवालात ‘Individual No 2’ च्या हॉटेलमधील रुममध्ये थेट ये-जा करणारी व्यक्ती गुरुनाथ मयप्पन होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या बंदीमुळे धोनी हॉटेलच्या बिझनेसरुममध्ये रोज सर्वांची भेट घेत होता. तिथे टीमचे सर्व सदस्य उपस्थित राहात होते. मात्र, तपास पथकाच्या सदस्यांना मयप्पन थेट धोनीच्या रुमपर्यंत जात असल्याचे तपासात कळाले. तो रोज धोनीच्या रुममध्ये कोणाचीही आडकाठी न येता जात होता. एवढेच नाही, तर आयपीएल 6 च्या मॅच दरम्यानही तो धोनीशी थेट संपर्क ठेवून होता.
हॉटेलच्या स्टाफसोबत केलेल्या चौकशीत खुलासा
तपास अधिकार्यांनी खेळाडू, टीम अधिकारी आणि हॉटेलच्या स्टाफकडे केलेल्या चौकशीनंतर तपासकर्ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले. मयप्पन चेन्नई टीमचा मालक असल्याचे सर्वांना सांगण्यात आले होते. टीमचा मालक हीच त्याची ओळख होती, म्हणून तो थेट धोनीच्या रुमपर्यंत पोहोचू शकला होता.
श्रीनिवासन यांच्या वकीलांचा अजब तर्क
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीत मयप्पनचे नातेवाईक आणि बीसीसीआयचे प्रमुख श्रीनिवासन यांच्या वकीलांनी अजब तर्क सांगितला. ते म्हणाले, की मयप्पनला सट्टेबाजीत मोठे नुकसान झाले आहे. जर त्याला आतली बातमी माहित असती तर, त्याचे नुकसान झाले नसते. मात्र, मुदगल समितीने केलेल्या तपासात स्पष्ट झाले आहे, की मयप्पन आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी दिवसातून दोन-तीनवेळा भेटत होते. मुदगल समितीने मयप्पनचे सट्टेबाजीशी आणि टीम चेन्नईशी घट्ट नाते असल्याचे ठासून सांगितले असतानाही श्रीनिवासन आणि टीम चेन्नई जोर देऊन सांगत होते, की त्याचा टीमशी काहीही संबंध नाही आणि त्यामुळे त्याला टीमच्या स्ट्रॅटिजीची माहिती नव्हती.