आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाची आयपीएल शारजात; अबुधाबी, यूएईतही होणार सामने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयपीएल-7 च्या यजमानपदाचा गोंधळ संपला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धाही मतदानाप्रमाणेच टप्प्याटप्प्यात घेण्याचा निर्णय बीसीसीआयने आज घेतला. एकूण तीन टप्प्यांत ही स्पर्धा यंदा होईल.

पहिला टप्पा संयुक्त अरब-अमिरातीमध्ये (दुबई, शारजा, अबुधाबी) 16 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत होईल. दुसरा टप्पा भारतातच मतदान झालेल्या राज्यांमध्ये सरकारची परवानगी मिळाल्यास होईल अथवा त्या टप्प्यातील सामने बांगलादेशात घेण्यात येतील. दुसरा टप्पा 1 मे ते 12 मे या कालावधीत होईल आणि तिसरा व अखेरचा निर्णायक टप्पा 13 मे रोजी देशातील संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकार परवानगी देईल त्या तारखेपासून 1 जूनपर्यंत होईल. तीन तुकड्यांमध्ये होणार्‍या सातव्या आयपीएल स्पर्धेची घोषणा करून बीसीसीआयने सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम दिला आहे. 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेने आयपीएलचे आयोजन केले होते.

देशांतर्गत निवडणुका 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत होणार आहेत. त्यादरम्यान आयपीएल सामन्यांना सुरक्षा व्यवस्था देता येणार नाही, असे गृहमंत्रालयाने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितल्याने अन्य पर्यायांचा शोध बीसीसीआयने सुरू केला होता. दक्षिण आफ्रिका सर्वच दृष्टींनी सोयीस्कर होती. मात्र, त्यांच्या क्रिकेट बोर्डाचा आणि सर्व क्रिकेट केंद्रांचा कोका कोलाशी करार झाला होता. त्यामुळे ‘पेप्सी’ या अन्य व प्रतिस्पर्धी शीतपेय कंपनीने पुरस्कृत केलेली स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करताना बीसीसीआयला अडचणी आल्या. यामुळे शेवटी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट बोर्डाला काही सामने आयोजित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली.

सुरक्षा मिळाली तर एक मेपासून सामने भारतात
एक ते 12 मेपर्यंतच्या सामन्यांसाठी बीसीसीआयने केंद्र शासनाची मदत मागितली आहे. ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत, तेथे सामने आयोजित करण्याची परवानगी बीसीसीआयने केंद्राकडे मागितली आहे. परवानगी मिळाल्यास भारतात सामने होतील, अन्यथा बांगलादेशात या सामन्यांचे आयोजन केले जाईल. असे असले तरी हे सामने भारतातच व्हावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे.

यूएईची निवड का ?
आयपीएल-7 सामन्यांच्या आयोजनासाठी बांगलादेश, श्रीलंका आणि द. आफ्रिका पर्याय होते. मात्र, ही संधी यूएईच्या हाती लागली. कारण स्पष्टच आहे. 1980-90 च्या दशकात भारताने यूएईत भरपूर सामने खेळले. प्रत्येक सामन्याच्या वेळी स्टेडियम खचाखच भरलेले असायचे. सामन्यांच्या वेळाही भारताला अनुकूल आहेत. यूएईत सामन्यांचे आयोजन केल्यास तिकीट विक्रीत चांगला फायदा होईल, असे बीसीसीआयला वाटते. आयपीएल-2 द. आफ्रिकेत आयोजित केल्याने नुकसान झाले होते.

पहिला टप्पा
16 ते 30 एप्रिल (यूएई)
दुसरा टप्पा
1 ते 12 मे (भारतात किंवा बांगलादेशात)
तिसरा टप्पा
13 मे ते 1 जून (भारतात सामने)
येत्या 16 मे रोजी मतमोजणीच्या दिवशी सामने नाहीत