आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl Live Match Kolkata Knight Riders Vs Sunrisers Hydrabad

कॅलिसची अष्टपैलू कामगिरी; हैदराबादच्या परेराची झुंज व्यर्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - जॅक कॅलिसने (41 धावा, 3 विकेट) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी आयपीएल-6 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. यजमान संघाने सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला. केकेआरचा आयपीएलमधील हा दुसरा विजय ठरला. प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी 4 बाद 180 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या टीमला 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 132 धावा काढता आल्या. सामन्यात एकमेव अर्धशतक ठोकणारा केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर (53) सामनावीरचा मानकरी ठरला.

धावांचा पाठलाग करणार्‍या सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर पार्थिव पटेल (27) आणि कॅमरून व्हाइट (34) यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी नऊ षटकांत 57 धावा काढल्या. ही जोडी जॅक कॅलिसने फोडली. त्याने पार्थिवला त्रिफळाचीत केले. त्यापाठोपाठ कॅलिसने व्हाइटलाही बाद केले. व्हाइटने 31 चेंडूत तीन चौकार व दोन षटकार ठोकले.

संगकारा अवघ्या दोन धावा काढून तंबूत परतला. त्याला रजत भाटियाने झेलबाद केले. सामन्यात तिषारा परेराने संघाकडून सर्वाधिक धावा काढल्या. त्याने 25 चेंडूत दोन चौकार व एक षटकार ठोकून 36 धावा काढल्या. मात्र, त्याला कॅलिसने त्रिफळाचीत केले. यानंतर तळातले फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने पाहुण्या टीमला अवघ्या 132 धावा
काढता आल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने मनविंदर बिस्लासोबत पहिल्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर केकेआरने चांगली सुरुवात केली. बिस्लाने 24 चेंडूत पाच चौकार ठोकून 28 धावा काढल्या. त्याला करण शर्माने विहारीकरवी झेलबाद केले. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या जॅक कॅलिसने झंझावाती फलंदाजी केली. त्याने कर्णधार गौतम गंभीरसोबत दुसर्‍या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. दरम्यान, गंभीरला ए. रेड्डीने त्रिफळाचीत केले. मोर्गनने कॅलिससोबत तिसर्‍या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी करून धावसंख्येला गती दिली. मोर्गनने 21 चेंडूत5 चौकार व 3 षटकार ठोकून 47 धावा काढल्या. याच्या बळावर केकेआरने 180 धावांचा पल्ला गाठला.

जॅक कॅलिसचा जलवा
जॅक कॅलिस कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने फलंदाजी करताना 41 धावा काढल्या. तसेच गोलंदाजीत त्याने सुरेख कामगिरी केली. त्याने हैदराबादचे सलामीवीर पार्थिव पटेल व कॅमरून व्हाइटला बाद केले. धडाकेबाज फलंदाजी करणारा परेरादेखील कॅलिसची शिकार ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या या ऑलराउंडरने चार षटकांत अवघ्या 13 धावा दिल्या.

गंभीर सामनावीर
केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरने पदाला साजेशी फलंदाजी केली. त्याने 45 चेंडंूत सहा चौकार व एक षटकार ठोकून सामन्यात अर्धशतक ठोकले. यासह तो सामनावीर ठरला. तसेच त्याने बिस्लासोबत 59 व कॅलिससोबत 43 धावांची भागीदारी करून केकेआरला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला.