आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तरीही आयपीएल होणार? निर्णय नवी दिल्लीत,खलबते मात्र चेन्नईत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचा नाद नवी दिल्लीत घुमत असला तरीही त्याचे पडसाद श्रीनिवासन यांच्या चेन्नईत उमटत आहेत. फारसा गाजावाजा न करता बीसीसीआयच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी आणि पदाधिकार्‍यांनी आज सायंकाळपर्यंत चेन्नई गाठली होती व उद्याच्या (27 जुलैच्या) ‘लाइन ऑफ अँक्शन’बाबत खलबते सुरू होती. दरम्यान, बीसीसीआयसमोर सध्या संकटांचे डोंगर उभे असले तरीही यंदाची आयपीएल (2014) होणारच, अशी माहिती बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘दिव्य मराठी’ला दिली.

बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी तर दोन दिवसांपासूनच चेन्नईत ठाण मांडले आहे. आज अन्य पदाधिकारी व श्रीनिवासन यांना जवळचे असलेले सदस्य ‘सिमेंट किंग’च्या प्रती असलेली विश्वासार्हता व निष्ठा अर्पण करण्याकरिता जमले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या तीन सूचनांवर काय करायचे, याबाबत रात्रीपर्यंत खल सुरू होता. दरम्यान, या चर्चेतील आणखी एक महत्त्वाचा तपशील हाती आला आहे. त्यानुसार कोणत्याही परिस्थितीत यंदाची आयपीएल स्पर्धा घेण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी केला आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे, आयपीएल स्पर्धा आठपेक्षा कमी संघांमध्येही आयोजित केली तर नुकसान होईल. मात्र, स्पर्धा आयोजिन न केल्यामुळे होऊ शकणारे नुकसान यापेक्षाही अधिक असेल, याची कल्पना सदस्यांना आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांना यंदाच्या आयपीएल स्पध्रेत सहभागी न केल्यास सहाच संघ उरतील. दोन संघ कमी झाल्यामुळे स्पध्रेचे साखळीचे 14 सामने कमी होतील. 76 ऐवजी 62 सामनेच होतील. एकूण फायदाही कमी होईल.

..तर फ्रँचायझी नुकसान भरपाई मागू शकतात
यंदा आयपीएल स्पर्धाच न घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला तर तो निर्णय त्यांच्या अंगलट येऊ शकतो. कारण तशी परिस्थिती उद्भवल्यास सर्वच्या सर्व फ्रँचायझी बीसीसीआयवर नुकसान भरपाईसाठी दावा ठोकू शकतात. नुकसान भरपाईच्या त्या आकड्यांपेक्षा स्पर्धा आयोजित करण्याचा खर्च कमी असेल.

दुबई येथील पहिल्या टप्प्याच्या आयपीएल स्पध्रेसाठीची पूर्वतयारी आधीच सुरू झाली होती. ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दोन संघांची बंदी यंदापुरती टाळता येते का, असा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नुकसान कमी करता येईल..
सहा संघांची स्पर्धा घेतलीच तर जाहिरात व प्रक्षेपण हक्कांपासून मिळणार्‍या आधीच्या तुलनेतील कमी आर्थिक लाभांमुळे नुकसान कमी करता येईल. स्पर्धा न घेतल्यास फ्रँचायझींच्या मालकांकडून अवास्तव नुकसान भरपाई मागितली जाण्याचा धोकाही काही सदस्यांना वाटत आहे.

आयपीएल थांबवायलाच हवे : बापू नाडकर्णी
क्रिकेटसंबंधात घडणार्‍या घटनांवर स्पष्ट नाराजी व्यक्त करीत सद्य:स्थितीत काही काळ आयपीएल थांबवायलाच हवे, असे मत भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू बापू नाडकर्णी यांनी व्यक्त केले. त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या विधानाचे एक प्रकारे सर्मथनच केले आहे.

श्रीनिवासन यांनी खूप पूर्वीच पायउतार व्हायला हवे होते. तसे झाले असते तर ही वेळच आली नसती, असे मतदेखील नाडकर्णी यांनी व्यक्त केले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आयपीएलबाबत योग्य पावले न उचलल्यास नागरिकांचा त्यावरील विश्वास संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे आयपीएलचे सातवे सत्र थांबवायला हवे, असे म्हटले आहे.