आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL : वानखेडे स्टेडियमवर ‘धवल’क्रांती !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सामनावीर डेवेन स्मिथ, पोलार्डच्या शानदार फलंदाजीनंतर वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 58 धावांनी नमवले. धवल कुलकर्णीने 3 (दिलशान, कोहली, डिव्हिलर्स) विकेट घेतल्या. ‘गेल का खेल’ बघण्यासाठी आलेल्या चाहते निराश झाले. क्रिकेटच्या मैदानावरील ‘गॉडजिला’ म्हणून चर्चेत आलेला गेल मुंबईविरुद्ध 17 धावा काढून बाद झाला.


गेल फ्लॉप, धवल हिट :धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही. गेल-दिलशानने जॉन्सन-मलिंगाचा सावधपणे सामना केला. या दोघांविरुद्ध बंगळुरूच्या फलंदाजांनी फार जोखीम घेतली नाही. सहाव्या षटकात धवल कुलकर्णी गोलंदाजीला आला. धवलने येताच दिलशानला जॉन्सनकरवी झेलबाद केले. गेलचा धोका हरभजनसिंगने संपवला. भज्जीच्या गोलंदाजीवर गेलचा झेल रायडूने सीमारेषेजवळ पकडला. गेल बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंनी एकच जल्लोष केला. जणू काही सामनाच जिंकला आहे, असे हावभाव इंडियन्सच्या खेळाडूंचे होते. गेलने 20 चेंडूंत 18 धावा काढल्या. पुढच्या षटकात धवलने आऊटस्विंगवर विराट कोहलीला यष्टिरक्षक कार्तिककरवी झेलबाद केले. कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. एका चेंडूनंतर याच षटकात धवलने डिव्हिलर्सला (2) कार्तिककरवी झेलबाद केले. सौरव तिवारी (21) आणि अरुण कार्तिक (12) यांनी थोडा संघर्ष केला, मात्र ते अपयशी ठरले. मुंबई इंडियन्सकडून धवल कुलकर्णीने 19 धावांत 3, तर हरभजनसिंगने 21 धावांत 2 विकेट घेतल्या.


तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने डेवेन स्मिथ (50), दिनेश कार्तिक (43), केरोन पोलार्ड (34) व सचिन तेंडुलकरच्या (23) खेळीच्या बळावर 20 षटकांत 7 बाद 194 धावा काढल्या. सचिन व स्मिथच्या आक्रमक सुरुवातीनंतर मुंबईची टीम दोनशेच्या पुढे स्कोअर उभा करेल, असे वाटत होते. मात्र, मधल्या फळीत झटपट गडी बाद झाल्याने मुंबईची धावगती कमी झाली. 18 व्या षटकात मुंबईचे तीन गडी बाद झाले. कर्णधार रोहित शर्मासह तीन फलंदाज धावबाद झाले.


सचिनची आक्रमक सुरुवात : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या षटकात रवी रामपॉलच्या पाचव्या चेंडूवर त्याला स्लिपमध्ये जीवदान मळाले. यानंतर सचिनने आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या 13 चेंडूंत 5 चौकारांसह 23 धावा ठोकल्या. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रुद्रच्या गोलंदाजीवर सचिन पायचीत झाला.


डेवेन स्मिथचे झंझावाती अर्धशतक : सचिन बाद झाल्यानंतर डेवेन स्मिथने मुंबईचा मोर्चा सांभाळला. त्याला कार्तिकची मोलाची साथ मिळाली. स्मिथने कार्तिकसोबत दुस-या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. तीन उत्तुंग षटकार आणि 4 चौकार खेचून स्मिथ बाद झाला. त्याने अवघ्या 36 चेंडूंत 50 धावा ठोकल्या. मोहंमदकडून स्मिथ त्रिपळाचीत झाला.


पोलार्डचा झंझावात : केरोन पोलार्डने 16 चेंडूंत 3 षटकार व 2 चौकारांसह 34 धावा ठोकल्या. पोलार्ड बाद झाल्यानंतर हरभजनसिंगने 8 चेंडूंत 3 चौकारांसह 16 आणि मिशेल जॉन्सनने 5 चेंडूंत एका षटकारासह नाबाद 9 धावा काढून मुंबईचा स्कोअर 190 च्या पुढे पोहोचवला. बंगळुरूकडून रवी रामपॉल, रुद्रप्रतापसिंग, विनयकुमार व सय्यद जमशेद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.


संक्षिप्त धावफलक - मुंबई - 7 बाद 194, वि.वि. बंगळुरु-7 बाद 136


सलग तीन विकेट, मात्र हॅट्ट्रिक नाही
विनयकुमारच्या गोलंदाजीवर 17.2, 17.3 आणि 17.4 अशा सलग तीन चेंडूंवर मुंबई इंडियन्सचे तीन फलंदाज बाद झाले. मात्र, ही हॅट्ट्रिक ठरली नाही. या तीन विकेटपैकी दोन खेळाडू धावबाद झाले आणि एक विकेट विनयकुमारने घेतली. 17.2 व्या चेंडूवर दिनेश कार्तिकला कोहलीने थेट फेकीवर धावबाद केले. पुढच्याच चेंडूवर अंबाती रायडूलाही कोहलीने धावबाद केले. यानंतर कोहली आणि पोलार्ड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलार्डचे लक्ष विचलित झाले आणि पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. विनयला मारण्याच्या नादात थर्डमॅनवर रवी रामपॉलने त्याचा झेल घेतला.