मुंबई - हंगेरियन महिला शरीरसौष्ठवपटू आणि इराणच्या पुरुष व महिलांनी येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला. भारताच्या हाती मात्र दुस-या दिवशी राहुल डोईफोडेच्या कांस्यपदकाचा अपवाद वगळता एकही पदक लागले नाही.
गोरेगावच्या मुंबई एक्झिबिशन सेंटरमध्ये आज इराण आणि हंगेरीचेच राष्ट्रगीत वारंवार वाजत होते.
पुरुषांमध्ये ज्युनियर ७० किलो वजनी गटात इराणीयन सय्यद मोबीनने सुवर्णपदक पटकावताना
इराकच्या गोरान ओथमान व भारताच्या राहुल डोईफोडेचे आव्हान पार केले. महाराष्ट्राचा डोईफोडे याला स्थानिक प्रेक्षकांचे प्रचंड पाठबळ लाभले होते. मात्र सय्यद मोबीनने प्रेक्षकांचे दडपण व
इराकच्या गोरानपुढे शरणागती पत्करली नाही. पुरुषांच्याच ७० किलोंवरील गटात उझबेकिस्तानच्या बोल्मिकिन मिखाईलने सुवर्णपदक पटकावले. इराणचा सय्यद तबाडकानी याला रौप्य तर थायलंडच्या अपीचाई वांदी याला कांस्यपदक मिळाले.
महिलांच्या अॅथलेटिक्स सौष्ठवात हंगेरीच्या पॅलेसियन ज्युडियने सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. युक्रेनची किलुचिनकोव्हा दुसरी, तर थायलंडच्या रूंगटवानने तिसरा क्रमांक पटकावला.
त्याच स्पर्धेत महिलांच्या सीनियर गटात सिंगापूरच्या नूर फरिनाने सुवर्ण, न्यू कॅलेडोनियाच्या विर्जीनीने रौप्य, तर हंगेरीच्या नॅनी बेरिनाने कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या अॅथलेटिक्स सौष्ठव स्पर्धेत थायलंडच्या किट्टी पाँगाने सुवर्णपदक पटकावले.
महिलांची अखेरची स्पर्धा
आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतून यापुढे महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा, पीळदार स्नायूंचे दर्शन घडवणारी स्पर्धा बाद होणार आहे. मंगळवारी होणारी महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा ही अखेरची ‘बॉडीबिल्डिंग’ स्पर्धा असेल. यापुढे महिलांसाठी केवळ उत्कृष्ट शरीरसंपदा, सौष्ठव, उत्कृष्ट सादरीकरण अशा गटांमध्ये स्पर्धा होतील. यापुढे महिलांसाठी वेटट्रेनिंग स्पर्धा होणार नाहीत.