आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू- लेग स्पिनर श्रेयस गोपालने घेतलेली हॅट्ट्रिक आणि आर.विनयकुमारच्या 4 विकेटच्या बळावर रणजी ट्रॉफी विजेता कर्नाटकने शेष भारत संघाचा एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत पराभव करत इराणी चषकावरही आपले नाव कोरले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी शेष भारताने 3 बाद 114 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. नाबाद फलंदाज बाबा अपराजित (42) आणि दिनेश कार्तिकने (9) चौथ्या दिवशीच्या खेळाचा प्रारंभ केला. कालच्या धावसंख्येत 16 धावांची भर घातल्यानंतर विनयकुमारने दिनेश कार्तिकला त्रिफळाचीत आणि त्यानंतर मनदीप सिंगला (2) पायचीत बाद करून शेष भारताच्या पडझडीस सुरुवात करून दिली. त्यानंतर शेष भारत संघाचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या बनवू शकला नाही. लेगस्पिनर श्रेयस गोपालने बाबा अपराजित (7), अशोक डिंडा (0) आणि पंकज सिंग (0) यांना लागोपाठ बाद करत आपल्या क्रिकेट करिअरमधील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली.
तत्पूर्वी, कर्नाटकचा गोलंदाज विनयकुमार (6) आणि स्टुअर्ट बिन्नीने (3) केलेल्या वेगवान मार्यासमोर शेष भारताचा पहिला डाव 201 धावांतच आटोपला होता. तर कर्नाटकने पहिल्या डावात 606 धावा काढल्या होत्या. त्यात स्टुअर्ट बिन्नी (122) आणि चिदंबरम गौतम (122) यांनी ठोकलेल्या शतकांचा समावेश होता. शिवाय गणेश सतीश यानेही 84 धावांची दमदार खेळी केली होती.
शेष भारताकडून पंकज सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी करत 6 बळी मिळवले होते. सामन्यात भेदक गोलंदाजी करत शेष भारताच्या दोन्ही डावात मिळून 11 बळी घेणार्या आर. विनयकुमारला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.
बिन्नीची अष्टपैलू कामगिरी
कर्नाटकचा संघाचा मध्यक्रमातील फलंदाज स्टुअर्ट बिन्नीने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत लक्ष वेधून घेतले. 3 बळी घेत शेष भारताचा पहिला डाव गुंडाळण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शिवाय फलंदाजीत 122 धावांची आक्रमक खेळी साकारून कर्नाटकला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. आयपीएलच्या सातव्या पर्वात 12.50 कोटींची घवघवीत बोली मिळवणारा शेष भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकनेही या सामन्यात भरीव कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात 91 तर दुसर्या डावात 27 धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक
शेष भारत- पहिला डाव सर्वबाद 201 आणि दुसरा डाव सर्वबाद 183. कर्नाटक - पहिला डाव सर्वबाद 606.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.