आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून इराणी ट्रॉफीला सुरूवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणजी चॅम्पियन मुंबई आणि सलग सात वेळेसचा विजेता शेष भारत यांच्यात बुधवारपासून इराणी ट्रॉफी क्रिकेट सामना रंगणार आहे. या पाचदिवसीय सामन्यात युवा आणि अनुभवी खेळाडूंत झुंज रंगेल. या सामन्यातील चांगल्या कामगिरीच्या बळावर 22 फेब्रुवारीपासून सुरू होणा-या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय खेळाडू आपली दावेदारी करू शकतील.

शेष भारताची टीम सलग आठव्या वेळी विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. दुसरीकडे 40 वेळा रणजी चॅम्पियन टीम मुंबई विजयाच्या लक्ष्याने खेळेल. शेष भारताचे नेतृत्व वीरेंद्र सहवाग आणि मुंबईचे नेतृत्व अभिषेक नायरकडे असेल. आगरकर जखमी झाल्यामुळे नायरकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

सध्या सुमार फॉर्मशी संघर्ष करीत असलेला ऑफस्पिनर हरभजनसिंग आणि केरळचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीसंत यांना यांना शेष भारताच्या 14 सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. संघात शिखर धवन, मुरली विजय यांचासुद्धा समावेश आहे. या दोघांनी लढतीत चांगली कामगिरी केल्यास गौतम गंभीरच्या जागी एकाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मधल्या फळीसाठी मुंबईकडून अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, तर शेष भारताकडून सुरेश रैना, मनोज तिवारी यांची परीक्षा होईल. मुंबईच्या सचिन तेंडुलकरवरही निवड समितीचे लक्ष असेल. रणजीत सलग दोन शतके ठोकून आपण अजूनही मोठ्या फॉर्मेटसाठी फिट असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.

राष्‍ट्रीय निवड समितीचे खास लक्ष युवा वेगवान गोलंदाज मुंबईचा धवल कुलकर्णी, शमी अहेमद आणि शेष भारताचा ईश्वर पांडे यांच्यावर असेल. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे युवा खेळाडू जोरदार प्रयत्न करतील. इराणी ट्रॉफीत मुंबईची टीम 27 व्या वेळी लढणार आहे. यापैकी 14 वेळा मुंबईने, तर 12 वेळा शेष भारताने विजय मिळवला होता. एका प्रसंगी दोघेही संयुक्त विजेते ठरले होते.

इराणी ट्रॉफीसाठी टीम
शेष भारत : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, मनोज तिवारी, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, हरभजनसिंग, शांताकुमारन श्रीसंत, प्रज्ञान ओझा, ईश्वर पांडे, अभिमन्यू मिथुन, अंबाती रायडू, शमी अहेमद, जलज सक्सेना.
मुंबई : अभिषेक नायर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वसीम जाफर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, हिकेन शाह, आदित्य तारे, अंकित चवन, जावेद खान, शरदूल ठाकूर, विशाल दाभोळकर.