आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ireland Earned A Famous Win Over The West Indies In Their First Of Two Twenty20 Internationals

आयर्लंडची वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडीजवर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमैका - पाहुण्या आयर्लंड टीमने टी-20 चा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडीजला धूळ चारली. आयर्लंडने यजमान टीमला घरच्या मैदानावर सलामी टी-20 सामन्यात 6 गड्यांनी पराभूत केले. या विजयासह पाहुण्या टीमने दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा टी-20 सामना शुक्रवारी किंग्स्टन येथे होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 8 गडी गमावून 116 धावा काढल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडने 19.1 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. जॉयसी (नाबाद 40), पोयेंटर (32) आणि ओब्रायनच्या (नाबाद 15, 2 विकेट) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर आयर्लंडने सामना जिंकला.
धावांचा पाठलाग करणार्‍या आयर्लंडची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर व कर्णधार पोर्टफिल्ड (4) आणि स्टर्लिंग (0) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या जॉयसीने संघाचा डाव सावरला. त्याने पोयेंटरसोबत चौथ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली. यासह त्याने टीमचा विजय निश्चित केला. यात ओब्रायनने नाबाद 15 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत एस. बद्रीने चार षटकांत 18 धावा देत 2 गडी बाद केले. तसेच रामपाल आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
गेल, सॅम्युअल्सकडून निराशा
नाणेफेक जिकूंन प्रथम फलंदाजी करणार्‍या विंडीजकडून स्मिथ (14) आणि क्रिस गेल (18) यांनी दमदार खेळीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. स्फोटक फलंदाज गेलला कुसकने डॉर्केलकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ सॅम्युअल्स (16), सिमन्स (16), डी. ब्राव्हो (8), रस्सेल (15) झटपट तंबूत परतले. गोलंदाजीत कुसक, मुर्तघ आणि ओब्रायनने प्रत्येक दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज : 8 बाद 116, पराभूत वि. आयर्लंड : 4 बाद 117
छायाचित्र - अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर चर्चा करताना आयर्लंडचा जॉयसी आणि पोर्टफिल्ड.