आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी सचिनच्या: पहिल्या भेटीत फक्त ‘हॅलो’च म्हणू शकलो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरला मी 2002 मध्ये बंगळुरूच्या राष्‍ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कॅम्पमध्ये पहिल्यांदा बघितले होते. सचिनसोबत ती माझी पहिली भेट होती. सचिन समोर आल्यानंतर माझी बोलतीच बंद झाली. पहिल्या भेटीत मी फक्त एकच शब्द बोलू शकलो. एकच शब्द..‘हॅलो’. दुसरा शब्दसुद्धा माझ्या तोंडातून निघाला नाही. मी स्तब्ध झालो होतो. साक्षात सचिन तेंडुलकर समोर आहे, यावर माझा विश्वास बसत नव्हता. सचिन तेंडुलकरला खेळताना बघून मी मोठा झालो. सचिनसारखे यश मिळवणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. ते स्वप्न मीसुद्धा बघितले. पुढे चालून मला सोबत खेळण्याची संधी मिळाली. ते माझे नशीबच होते. सचिनसोबत मैदानावर, पॅव्हेलियनमध्ये, ड्रेसिंग रूममध्ये, हॉटेलात, एखाद्या मित्राच्या घरी वेळ घालवणे म्हणजे आनंदाची पर्वणी असते.
मैदानावर अनेक वेळा सचिनने मला मार्गदर्शन केले. ज्या वेळी माझी गोलंदाजीची लय बिघडायची, माझ्या जवळ येऊन सचिन मला समजावून सांगायचा, ‘जास्त विचार करू नकोस. तुझ्याकडे नॅचरल स्विंग आहे. फक्त अचूक टप्प्यावर चेंडू टाक. चेंडू आपोआप स्विंग होईलच. तू हे करू शकतोस,’ असे त्यांनी मला अनेक वेळा म्हटले. एखाद्या विकेटसाठी मला प्रोत्साहित करायचे, ‘इरफान, ही विकेट तूच घेऊ शकतोस. फक्त त्या फलंदाजाला थोडा अडचणीत आण, बघ तुला विकेट मिळते की नाही,’ असे मला प्रोत्साहित करून माझ्याकडून ब-याच वेळा चांगली कामगिरी करून घेतली. मैदानावर कधी माझ्या गोलंदाजीवर सचिनकडून मिसफिल्ड झाले तर सचिन वाईट वाटायचे.
सचिन तेंडुलकर खेळाडू म्हणून जितका महान आहे, तितकाच व्यक्ती, मित्र म्हणून मनमिळाऊ, मस्तीखोर आहे. सचिनसोबतची एक आठवण मी कधीही विसरू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया टूरसाठी माझी पहिल्यांदा निवड झाली होती. आम्ही सारे जण ऑस्ट्रेलियात गेलो. तेथे हॉटेलात सचिन काही तरी खाण्यात गुंग होता. सचिनच्या हाती हिरव्या रंगाचा दिसायला सुंदर असलेला एक पदार्थ होता. ते बघून मलाही तो पदार्थ खावासा वाटला. मोह झाला. मी आवरू शकलो नाही. सचिनकडे गेलो. ‘सचिन पाजी, हा कोणता पदार्थ तुम्ही खात आहात? दिसायला तर खुपच सुंदर दिसत आहे,’ असे मी विचारले. ‘ये इरफान. हा खूप गोड पदार्थ आहे. तूसुद्धा खा ना,’ असे सचिनने मला म्हटले. मी याच संधीची वाट बघत होतो. मी डिशमधून तो पदार्थ खाण्यास उचलला. तो पदार्थ खाल्ल्यानंतर माझ्या नाका-तोंडातून धूर निघायचेच उरले होते. अत्यंत तिखट असा काही तरी तो पदार्थ होता. त्या पदार्थाचे मला नीट नाव आठवत नाही. तो पदार्थ गोड नव्हे, तर अत्यंत तिखट असा हिरव्या चटणीचा थर असलेला मेनू होता. मला खूप तिखट लागले. मला बघून सचिन पाजीला खूप हसू आले. त्यांनी हा किस्सा संघातील सर्व खेळाडू मित्रांना सांगितला. हा किस्सा ऐकल्यानंतर प्रत्येक जण पोट धरून हसला. तिखट लागल्यानंतर मला सर्वप्रथम सचिन पाजीनेच पाणी दिले. मी ज्युनियर होतो. वरिष्ठ खेळाडूंच्या धाकात मी राहू नये. त्यांच्यासोबत मला सहज मित्रासारखे वावरता यावे, यासाठी त्यांनी माझ्यासोबत अशी मस्ती केली. अगदी हक्काच्या दोस्तासारखी. सचिन किती मस्तीखोर आहे, हे यावरून लक्षात येते.
आम्ही पाकिस्तान दौ-यावर गेलो होतो. त्या वेळी मी माझ्या आई-वडिलांना सामना पाहण्यास बोलावले होते. माझे आई-वडील पहिल्यांदा माझा सामना बघत होते. सचिनला हे कळताच सचिन स्वत:हून माझ्या आई-वडिलांकडे आला. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सचिनची भेट झाल्यानंतर माझ्या आई-वडिलांना गहिवरून आले होते.
सचिन खेळाडू म्हणून जितका मोठा, तितकाच माणूस म्हणूनही तो ग्रेट आहे. इतक्या यशानंतरही त्याच्याकडे बिंदूइतकासुद्धा गर्व नाही. सचिन निवृत्त होत आहे, हे ऐकल्यावर क्षणभर भरवसाच बसला नाही. सचिन म्हणजे भारतीय क्रिकेटमधील ‘रोशनी’ आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या दुनियेत ही चमक निश्चित थोडी कमी झालेली दिसेल. क्रिकेटच्या विश्वातला धु्रवतारा आहे तो..!!!
बिर्याणीप्रेमी सचिन
मला आणखी एक घटना आठवते. 2007 मध्ये बडोद्याला एक सामना होता. त्या सामन्यासाठी आलेल्या टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना मी घरी जेवणासाठी आमंत्रित केले. जेवणात माझ्या आईने खास स्वत:च्या हाताने बिर्याणी तयार केली. सर्व खेळाडू जेवणास आले त्या वेळी सचिनने बिर्याणीवर ताव मारला. त्याला ती बिर्याणी खूप आवडली. दुस-या दिवशी सचिनने आणखी बिर्याणी खायची असल्याची विनंती केली. मी तसेच केले.
शब्दांकन: राजेश शर्मा