आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी फायनलला विजय झोल मुकणार ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रणजीच्या अंतिम सामन्यापर्यंत महाराष्‍ट्राला पोहोचवण्यात मोलाचे योगदान देणारा महाराष्‍ट्राचा फलंदाज विजय झोल याला रणजीच्या अंतिम सामन्यातील सहभागावर पाणी सोडावे लागणार आहे. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या तयारीसाठी बंगळुरूला आयोजित शिबिरात त्याने सहभागी होण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.
नॅशनल क्रिकेट अकॅडमीत मंगळवारपासून 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या शिबिराला प्रारंभ झाला आहे. महाराष्‍ट्राचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी विजय झोलचे हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशा शब्दांत त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना प्रथमच अंतिम सामन्यात खेळण्याची संधी असताना ती गमवावी लागणे हा विजयसाठी खरोखरच दुर्दैवी क्षण असल्याचे भावे यांनी नमूद केले. नेटमधील व्यायाम आणि सरावापेक्षा प्रत्यक्ष रणजीच्या अंतिम सामन्यात सराव करणे खेळाबाबतच्या जाणिवांना अधिक प्रगल्भ करणारे असते. मात्र, याबाबत आम्ही अधिक काहीही करू शकत नसल्याचे भावे यांनी सांगितले. महाराष्‍ट्राने बीसीसीआयकडे झोलसाठी उपांत्य सामन्यापुरतीच परवानगी मागितली होती, असे बीसीसीआयचे अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. रणजी फायनल 29 जाने.पासून होणार आहे.
एमसीएच्या शानभाग यांचे श्रीनिवासन यांना पत्र
महाराष्ट्राचा विजय झोलला कर्नाटकविरुद्ध रणजी अंतिम फेरीच्या सामन्यात खेळण्याची परवानगी द्यावी, असे पत्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी सुधाकर शानभाग यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पाठवले आहे. गुरुवारी चेन्नई येथे होणा-या कार्यकारी समितीच्या बैठकीदरम्यान विजय झोल याला 19 वर्षांखालील क्रिकेट संघाच्या सराव शिबिरातून रणजी अंतिम सामन्यापुरते मुक्त करण्याची परवानगी बीसीसीआयचे अध्यक्ष देतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. बीसीसीआयचे क्रिकेट व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला झोल याच्या संदर्भात अंतिम फेरीकरिता परवानगी देण्याची विनंती करण्याचे पत्र बीसीसीआयला देण्याचे सुचवले होते.