मुंबई - सिनेअभिनेता
रणबीर कपूरच्या मुंबई सिटी एफसी संघाने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत दुस-या विजयाची नोंद केली. यजमान मुंबई संघाने रविवारी पाहुण्या केरला ब्लास्टर्सवर १-० अशा फरकाने मात केली. एन.अनेल्काने ४५ व्या मिनिटाला गोल करून मुंबईला घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईच्या संघाने गुणतालिकेत पाचव्या स्थानी धडक मारली. सचिनच्या केरला संघाचा आयएसएलमधील हा तिसरा पराभव ठरला.
पुणे-युनायटेड आज सामना
इंडियन सुपर लीगमध्ये सोमवारी पुणे एफसी आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड यांच्यात सामना रंगणार आहे. घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवण्याचा यजमान पुणे संघाचा प्रयत्न असेल. आतापर्यंत पुणे संघाला चारपैकी एका लढतीत विजय मिळवता आला. यासह पुणे संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तसेच युनायटेड संघ पाचपैकी दोन सामन्यांतील विजयासह गुणतालिकेत तिस-या स्थानावर आहे.
कोच एंटोनिओ हबासवर दोन सामन्यांची बंदी
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) इंडियन सुपर लीगचा संघ अथॅलेटिको डी कोलकाता संघाचे मुख्य प्रशिक्षक एंटोनिओ लोपेज हबासवर दोन सामन्यांच्या बंदीची कारवाई केली. लीगमधील सामन्यात केलेल्या गैरवर्तनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, हबास यांच्यावर चार सामन्यांच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला हाेता. हबास यांनी अपील केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील बंदीच्या कारवाईत दाेन सामन्यांची कपात झाली आहे.