मुंबई - आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया या पूर्व विभागाच्या महत्त्वाच्या सदस्याने शरद पवार यांना समर्थन दिल्यामुळे श्रीनिवासन हटाव मोहिमेला बळ यायला लागले आहे. दालमिया यांची कोलकाता क्रिकेट असोसिएशन आणि नॅशनल क्रिकेट अशी दोन मते पवारांच्या बाजूने झुकली आहेत.
सहा राज्ये आणि तीन सरकारी संस्थांची अशी एकगठ्ठा ९ मते शरद पवार विरुद्ध श्रीनिवासन या युद्धाचा निकाल स्पष्ट करतील. या ९ मतांपैकी एक दिल्लीचे आणि युनिव्हर्सिटी, रेल्वे व सेनादल या ४ मतांची दिशा अरुण जेटली ठरवू शकतात. सध्या तरी जेटली यांनी श्रीनिवासन यांचीच बाजू धरली आहे.
पश्चिम विभागातील मुंबई, महाराष्ट्र, सौराष्ट्र, बडोदा, गुजरात या मतांबरोबरच विदर्भ, गोवा, मध्य प्रदेश या महाराष्ट्रहिताच्या मतदारांचीही पवार यांच्या उमेदवारीला अनुकूलता आहे. पूर्व व उत्तर विभागातील मतांच्या फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पवार यांची मते वाढण्याची शक्यता आहे. जेटलींची भुमिकाही आता महत्वाचे ठरेल.